मुंबई: कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाने ‘कॅनरा रोबेको मल्टि-ॲसेट अलोकेशन फंडा’चा एनएफओ खुला झाल्याचे गुरुवारी जाहीर केले. हा नवीन फंड ९ मे ते २३ मे या दरम्यान प्रारंभिक गुंतवणुकीसाठी खुला असेल. ६ जून रोजी अथवा त्या आधीपासून तो पुनर्गुंतवणुकीस खुला होईल.

मल्टी-ॲसेट श्रेणीतील ही उपलब्ध झालेली २६ वी योजना असून, कॅनरा रोबेकोची या श्रेणीतील ही पहिलीच योजना आहे. कॅनरा रोबेको मल्टि-ॲसेट अलोकेशन फंड भारतातील समभाग, रोखे तसेच मनी मार्केट साधने, या शिवाय गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करेल.

सक्रिय मल्टि-ॲसेट वितरण धोरणाचा अवलंबल, समभागसंलग्न गुंतवणुकीचा वाटा ३० ते ८० टक्क्यांपर्यंत राखण्याची लवचिकता आणि सोन्यातील गुंतवणुकीसाठी फंड घराण्याचे विशेष-रचित प्रारूप हे या नवीन योजनेचे वैशिष्ट्य आणि कामगिरीतील वेगळेपण अधोरेखित करेल, असे कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीदत्त भांडवलदार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजाराच्या मूल्यांकनानुसार समभाग जोखीम अधिमूल्यानुसार पोर्टफोलिओचे मालमत्ता विभाजन होईल. या फंडाच्या एकूण मालमत्तेपैकी ६५-८० टक्के समभागांमध्ये, १०-२५ टक्के सोने आणि चांदीत, तर १०-१५ टक्के रोखे साधनांत गुंतविली जाईल. शिवाय ‘रिट्स’ आणि ‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणुकीची तरतूद आहे. भांडवली बाजारातील अस्थिरतेची जोखीम कमी करून दीर्घकाळात वाजवी भांडवली लाभ मिळविणे हे आहे, असे या फंडाचे उद्दिष्ट असल्याचे भांडवलदार यांनी स्पष्ट केले. फंडाच्या समभागसंलग्न गुंतवणुकीचे व्यवस्थापन अमित कदम आणि ॲनेट फर्नांडिस, तर रोखे गुंतवणुकीचे व्यवस्थापन कुणाल जैन हे पाहणार आहेत.