मुंबई : वडिलांची देखभाल करण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय इसमाने (केअर टेकर) १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडित तरुणी १६ वर्षांची आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरूणाला खिळले होते. वडिलांच्या देखभालीसाठी तिने महेश राजपूत (५६) याला केअर टेकर म्हणून नेमले होते. १ जूनपासून राजपूत पीडितेच्या घरी तिच्या वडिलांची देखभाल करण्यासाठी येत होता. तो पीडितेच्या घरीच रहात होता. या काळात तो सतत पीडित तरुणीला व्हॉटस ॲपवर मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पीडित तरुणी त्याला टाळत होती. दरम्यान, त्याने पीडिता घरात झोपली असताना तिच्याशी गैरवर्तन केले. याबाबत पीडितने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश राजपूतविरोधत विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२), ७८ (२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमातील (पोक्सो) कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी हा मूळ बदलापूर येथे राहणार आहे. सध्या तो फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत २०२० मध्ये ९३८, २०२१ मध्ये १ हजार ६६ आणि २०२२ मध्ये १ हजार १५७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये ७५ टक्के, तर विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये ३७ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये १ हजार ३४१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर २०२३ मध्ये अशा स्वरूपाचे १ हजार १०८ गुन्हे नोंदवण्यात आले होते.

२०२४ मध्ये नोंदलेल्या या गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्काराच्या, ६६७ विनयभंगाच्या, आणि ३५ छेडछाड व अश्लील शेरेबाजीच्या घटनांचा समावेश आहे. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार पीडित अल्पवयीन मुलीच्या ओळखीचेच असतात. वाढत्या जनजागृतीमुळे आणि पीडिता आता तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्यामुळे प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे पोलिसांना सांगितले.