मुंबई : उल्लू या ॲपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या रिॲलिटीशो मध्ये महिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी निवेदक एझाज खान तसेच दिग्दर्शक राजकुमार पांडे यांच्याविरोधात अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंजरग दलाच्या तक्रारीवरून अश्लील कृत्य, महिलांची असभ्य वर्तन, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘उल्लू’ या ॲपवर ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा रिॲलिटी शो सुरू असून त्याची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. या क्लिपमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोचा निवेदक (होस्ट) एझाज खान सहभागी स्पर्धक तरुणींबरोबर अश्लील संवाद साधून अश्लील कृत्य करत होता.

ऑन कॅमेरा सुरू असलेल्या या अश्लील कृत्यामुळे संतापाची लाट पसरली. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी करत असभ्य वर्तन करणाऱ्या एझाज खान याला अटक करण्याची मागणी केली आहे.या शोच्या विरोधात बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया (४०) यांनी शुक्रवारी अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दिग्दर्शक राजकुमार पांडे आणि निवेदन (होस्ट) एझाज खान यांचे वर्तन महिलांचा अवमान करणारे, भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारे असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे क्लिप फेसबुक, यू ट्युब, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर वायरल करून समाजात असभ्यता पसरविण्यात येत असून भारतीय महिलांचा अवमान करणारे आहे. हा रिॲलिटी शो ‘उल्लू’ या ॲपवर प्रसारित होत आहे. उल्लूचे कार्यालय अंधेरी पश्चिमेच्या लोटस बिझनेस पार्कमध्ये असून बजरंग दलाने त्यांना निवेदन देऊन हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण थांबविण्याची मागणी केली होती. उल्लू ॲपने अश्लील मजकूर असलेली शो तयार केला, त्याचे दिग्दर्शन केले, एझाज खान याने महिलांचा अवमान केल्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अंबोली पोलीस ठाण्यात उल्लू ॲपचे निर्माते, दिग्दर्शन राजकुमार पांडे आणि निवेदन एझाज खान यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुठले गुन्हे दाखल?

भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३ (५), माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ च्या कलम ४, ६ आणि ७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे एझाज खान ?

एझाज खान हा अभिनेता असून सलमान खान निवेदक असलेल्या बिग बॉसच्या सातव्या पर्वातून चर्चेत आला होता. हाऊस अरेस्ट या उल्लू ॲपवरली रिॲलिटी शोमधून अश्लीलता पसरविण्याचा त्याच्यावर आरोप आहे. उल्लू ॲपवर प्रौढांसाठी अश्लील मजकूर असलेले लघुपट (शॉर्ट फिल्मस) तयार करण्यात येतात.