मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या (ठाकरे) ‘युवा सेना’ आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनच्या (‘बुक्टु’) अधिसभा सदस्य व कार्यकर्त्यांनी १५ एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेर आंदोलन केले होते. मात्र जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारखे कृत्य केल्याप्रकरणी ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्य, तसेच कार्यकर्ते अशा एकूण २३ जणांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १३५, भारतीय न्याय संहिता कलम १८९ (१), १८९ (२), १८९ (३), १९० आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही संघटनेस किंवा व्यक्तीस कोणत्याही स्वरुपाच्या सभा, आंदोलने, मोर्चा, उपोषण, निषेध मोर्चा, बैठका व तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे पूर्वपरवानगीशिवाय आयोजन करता येणार नाही, असा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषद बैठकीत मंजुरी मिळाली नसल्याचा दावा ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सदर अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’ संघटनेने मंगळवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सदर आंदोलन शांततेत करण्यात येईल, अशी कल्पनाही संघटनांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाला दिली होती.
दरम्यान, उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली आणि सदर संघटनांच्या आंदोलनासंदर्भात आझाद मैदान पोलिसांना लेखी पत्राद्वारे कळवून आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’ संघटनेला एक नोटीस पाठवून आंदोलन करू नये, असे सांगितले. मात्र तरीही दोन्ही संघटनांनी फोर्ट संकुलाबाहेरच आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्य व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आता सदर परिसरातील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारखे कृत्य केल्याप्रकरणी ‘युवा सेना’ आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्य आणि कार्यकर्ते अशा २३ जणांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.