मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या कारवाईत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) उपनिबंधकासह एका व्यक्तीला तीन लाख रुपये लाच मागितल्याच्या आरोपाखाली गुरूवारी अटक केली. याप्रकरणी सीबीआयने सापळा रचला होता. त्यावेळी रक्कम स्वीकारल्यानंतर प्रथम संबंधित व्यक्तीला पकडण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी आरोपी उपनिबंधकाला अटक करण्यात आली.
एनसीएलचीच्या मुंबई खंडपीठाचे उपनिबंधक (डेप्युटी रजिस्टार) चरण प्रताप सिंह व संबंधित व्यक्ती करसन गणेश अहिर यांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती सीबाआयने दिली. सीबीआयने १४ मे रोजी प्राप्त तक्रारीच्या आधारावर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका हॉटेलचा मालक असून, त्या हॉटेलच्या मालकीसंदर्भात त्याचा व त्याच्या भावांमध्ये वाद सुरू आहे. संबंधित प्रकरण २ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबई येथील एनसीएलटीच्या कोर्ट क्रमांक ४ मध्ये दाखल करण्यात आले होते. हे प्रकर अद्याप प्रलंबित आहे. तक्रारीनुसार, ११ मे २०२५ रोजी आरोपी उपनिबंधकाने तक्रारदाराला याप्रकरणी मदत करण्यासाठी, तसेच प्रकरण त्याच्या बाजूने करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली.
तडजोडी अंती आरोपी उपनिबंधकाने ३ लाख रुपये लाच स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. सीबीआयने रचलेल्या सापळ्यात तीन लाख रुपये स्वीकारताना आरोपी अहिरला रंगेहाथ पकडले. या सापळ्यात एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांचा वापर करण्यात आला होता. पुढील सापळा कारवाईदरम्यान आरोपी उपनिबंधकासही त्याच्या लाच प्रकरणातील सहभागासाठी अटक करण्यात आली. सीबीआयने मुंबई व लखनऊ येथील आरोपींच्या निवासस्थानी छापे टाकून शोध मोहीम राबवली. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करीत आहे.