अनिश पाटील, लोकसत्ता 

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ७२ रेल्वे स्थानकांवर चार हजार अद्ययावत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पॅनिक बटनचा पर्याय देण्यात येणार आहे. भायखळय़ासह चार स्थानकांवर प्रायोगिक तत्त्त्वावर असे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय या अद्ययावत सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ‘चेहरा ओळख प्रणाली’ (फेस रेकग्निशन सिस्टीम) असल्यामुळे गुन्हे रोखण्यास रेल्वे पोलिसांना मदत होणार आहे.  

भायखळा, करीरोड, चिंचपोकळी व मशीद बंदर या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रायोगिक तत्त्वावर या स्थानकांवर या यंत्रणेची पाहणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या ७२ रेल्वे स्थानकांवर सुमारे चार हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नियोजनानुसार दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कल्याण ठाणे या सहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी ३०० अद्ययावात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उर्वरित स्थानकांवर सुमारे ३० ते ५० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> मंत्रालयातील प्रवेशासाठी तासनतास रांगेत; सामान्यांमध्ये संताप; नव्या नियमांचा जाच

या नव्या तंत्रज्ञानावर आधारित सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि गुन्हे रोखण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला. महिलांच्या सुरक्षेसाठी, तसेच इतर घटना रोखण्यासाठी काही सीसी टीव्ही कॅमेऱ्यांना पॅनिक बटनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. संकटसमयी ही कळ दाबल्यास सीसी टीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी केंद्रित होईल. त्यामुळे त्या ठिकाणची माहिती रेल्वे पोलिसांना तात्काळ मिळू शकेल. याशिवाय पुराव्यासाठी घटनेचे चित्रीकरणही करणे शक्य होईल. याशिवाय या सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये ‘चेहरा ओळख प्रणाली’ही  बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सराईत आरोपींची माहिती या यंत्रणेत संग्रहित केल्यानंतर त्याला तात्काळ सीसी टीव्ही कॅमेरा ओळखू शकेल. त्यामुळे गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपीला रोखणे शक्य होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार स्थानकांमध्ये बसविण्यात आलेल्या या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास करून यंत्रणेत योग्यते फेरबदल करण्यात येतील. या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण तीन ते चार ठिकाणांवरून करणे शक्य आहे. चार वर्षांपूर्वीच पश्चिम रेल्वेवरील स्थानकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.