मुंबई : ओव्हल मैदान आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील आर्ट डेको शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण इमारतींच्या वास्तूकलेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहायलयात एका खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वास्तूशैलीतील इमारती मियामी या शहरातील ओशन ड्राईव्ह परिसरात आहेत. त्यामुळे मियामी ते मुंबई… ओशन ड्राईव्ह ते मरीन ड्राईव्ह या अनोख्या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशिष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘आर्ट डेको अलाइव्ह’च्या संस्थापक स्मिता कनोडिया आणि डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संचालक तस्नीम मेहता उपस्थित होत्या.
वास्तूरचना शैलीतील ‘आर्ट डेको’ स्वरुपाच्या वास्तूकलेच्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मियामी आणि मुंबई या दोन शहरांमध्ये पहिल्याच ट्विन-सिटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये मियामीत ‘आर्ट डेको अलाइव्ह !’चा महोत्सव पार पडला होता. आता यानंतर मुंबईत या महोत्सवाची पहिली आवृत्ती ७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान विविध ठिकाणी पार पडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहायलयात करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेले मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यावेळी म्हणाले की, मुंबई शहर हे सध्या मोठ्या परिवर्तनातून जात आहे. मोठ्या प्रमाणावर इमारतींचा पुनर्विकास, पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. मात्र या परिवर्तनातही आपल्या शहरातील ही वास्तूरचना कला संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘आर्ट डेको’चा वारसा हा या परिवर्तनातही जपला पाहिजे. मुंबई महापालिकेची वास्तू पुरातन वारसा स्वरुपाची आहे. अशा वास्तूंमध्ये वास्तव्य करताना, काम करताना त्याचा प्रभावही आपल्यावर पडत असतो, असेही मत गगराणी यांनी व्यक्त केले.
करोनानंतरही एक वेगळी वास्तूशैली यायला हवी
साधारणत: प्लेगच्या साथीनंतरच्या काळात आर्ट डेको वास्तूशैली उदयास आली. त्यामुळे जगभरात नुकत्याच येऊन गेलेल्या करोनाच्या साथीनंतर आता मुंबईतही एक नवीन वास्तूशैली उदयास यायला हवी, अशी अपेक्षा मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली. मुंबईत लहानपणापासून आपण राहत होतो. त्यावेळीही आजूबाजूला या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती होत्या. मात्र आर्ट डेको प्रदर्शनाच्या निमित्ताने या इमारतींकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, असे मत शेलार यांनी यावेळी व्यक्त केले.
या आहेत आर्ट डेको शैलीतील मुंबईमधील इमारती
शासकीय विधी महाविद्यालय, कुलाबा येथील रिगल सिनेमा, मेट्रो चित्रपटगृह या जुन्या वास्तू आर्ट डेको वास्तूशैलीतील आहेत. या वास्तूंमध्ये छत्री किंवा घुमट असलेले मंडप, जाळीदार झरोके, अलंकारिक खांब, वर्तळाकार बाल्कनी, वैशिष्टयपूर्ण जिने यांचा समावेश आहे. मुंबईतील गॉथिक शैलीतील वास्तूंपेक्षा या इमारती वेगळ्या आहेत. याच शैलीतील काही इमारती शिवाजी पार्क परिसरातही पाहायला मिळतात. मरीन ड्राईव्ह लगतच्या बहुतांशी सर्व इमारती याच शैलीतील आहेत.
