मुंबई : देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असून अवयवदान वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोटो) यांनी यासाठी राज्यांना निर्देश दिले आहेत की रस्ते अपघातांमध्ये प्रथम पोहोचणारे ‘फर्स्ट रिस्पॉन्डर्स’म्हणजेच पोलिस, रुग्णवाहिका चालक, परिचारक, व आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी यांना संभाव्य अवयव दात्यांची (ब्रेन डेड रुग्णाची) ओळख पटविण्याचे प्रशिक्षण द्यावे.यातून पद्धतशीरपणे अपघातग्रस्तांमधून अवयवदान वाढविण्यात येणार आहे.

भारतामध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे फक्त एकाच व्यक्तीकडून मृत्यूनंतर (ब्रेन डेड) अवयवदान होते. स्पेनमध्ये हे प्रमाण दर ४६ प्रति दशलक्ष आणि अमेरिका, ब्रिटनमध्ये अनुक्रमे ३६ आणि २४ आहे. भारतात हेच प्रमाण १.०३ एवढे आहे. धार्मिक गैरसमज, जनजागृतीचा अभवा, योग्य नियोजन व संपर्काचा अभवा तसेच ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांना अवयदानाबाबत प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित लोकांचा अभाव यामुळे भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे.भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांना अवयव निकामी होण्याचे निदान होतो. त्यापैकी दोन लाख रुग्ण हे मूत्रपिंडविकारग्रस्त आहेत, पण उपलब्ध दात्यांच्या अभावामुळे केवळ २ ते ३ टक्के रुग्णांनाच जीवनरक्षक अवयवप्रत्यारोपण मिळते.

नोटोच्या आकडेवारीनुसार, मुंबईत मृत्यूनंतरच्या अवयवदानाच्या संख्येत कोविडनंतर थोडी सुधारणा दिसून आली आहे. तथापि यात मोठी वाढ होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०२० मध्ये ३० जणांचे मृत्यूनंतर अवयवदान झाले. २०२१ मध्ये ३३,२०२२ मध्ये ४७,२०२३ मध्ये ५०,२०२४मध्ये ६० जणांचे मृत्यूपश्चात अवयवदान तर २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ अवयवदान झाले आहे.यामध्ये मुख्यतः मेंदूमृत (ब्रेन डेड) रुग्णांकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, आणि स्वादुपिंड दान झाले आहेत.ब्रेन डेड म्हणजे जेव्हा रुग्णाचे मेंदूचे कार्य थांबते आणि तो कृत्रिम श्वसन यंत्राशिवाय जिवंत राहू शकत नाही. अशा अवस्थेत शरीरातील इतर अवयव जसे हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, आतडी, स्वादुपिंड आदी काही काळासाठी कार्यरत राहतात आणि ते प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतु ‘ब्रेन डेथ’ ची ओळख, प्रमाणपत्र, व अवयवसंकलन प्रक्रियेत विलंब होत असल्याने अनेकदा संभाव्य अवयव वाया जातात.

रस्ते अपघातग्रस्तांमधून संभाव्य दाते

आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार २०२३ मध्ये भारतात १.७ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाले. त्यापैकी ‘ब्रेन डेथ’ श्रेणीत मोडणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात असू शकतात. तथापि योग्य प्रशिक्षण, त्वरित प्रमाणपत्र व ‘ऑर्गन कोऑर्डिनेशन नेटवर्क’ नसल्यामुळे संभाव्य दाते ओळखले गेले नाहीत. तसेच अशा प्रकरणात नातेवाईकांचे योग्य प्रकारे कौन्सिलिंग हे फार महत्त्वाचे असून त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.तथापि अशी प्रशिक्षित मंडळी फारशी उपलब्ध नसल्याने ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान अधिक प्रमाणात होऊ शकत नाही. याचा विचार करून याबाबत कौन्सिलिंग करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची फळी निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आजघडीला मुंबई, चेन्नई, हैदराबाद, आणि पुणे ही चार शहरे अवयवदानात आघाडीवर आहेत.राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी फक्त १२,००० अवयव प्रत्यारोपण होतात, जे एकूण गरजेच्या केवळ १० टक्के आहे.

नोटोचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले की, राज्यांना आता अवयवदानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच राज्य सरकारांना अपघातस्थळी कार्यरत पोलिस, रुग्णवाहिका चालक, नर्सिंग स्टाफ व अग्निशमन दलाच्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात ‘ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन युनिट’ स्थापन करून, अपघातग्रस्त रुग्णांची माहिती थेट जवळच्या प्रत्यारोपण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ब्रेन डेड रुग्णाच्या माध्यमातून काही रुग्णांना जगण्याची नवी संधी मिळू शकते हे लक्षात घेऊन अवयवदान करा, जीवन वाचवा ही मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. भारतात आजघडीला सव्वा दोन लाख रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. तर ५० हजार रुग्णांना यकृत आणि ३० हजार रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. ब्रेन डेड रुग्णांची तात्काळ ओळख पटली व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णाचे अवयवदान करण्यास प्रवृत्त केले तर शेकडो रुग्णांना नवजीवन मिळू शकते हे लक्षात घेऊन आता रस्ते अपघातातील ब्रेन डेड रुग्णांमधून अवयवदान वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.