मुंबई : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी राज्यात दाखल झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पथक तीन दिवस राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सर्वदूर अतिवृष्टी झाली. अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला. खरीप हंगामातील सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांसह शेतजमीन, रस्ते, सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्ता, मनुष्य आणि पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी मुंबईत दाखल झाले. दुपारी त्यांनी रिझर्व बँकेला भेट दिली. सायंकाळी राज्य सरकारच्या विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन  आहे. पुढील दोन दिवस राज्यातील नुकसानग्रस्त भागाला भेटी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. या समितीला राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या पथकात विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्यासह ए. एल. वाघमारे, संचालक (कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग), के. वी. पटेल उपसचिव ( व्यय, वित्त विभाग), सत्यंद्र प्रताप सिंग, संचालक (जल शक्ती मंत्रालय), विशाल पांडे कार्यकारी अभियंता (रस्ते, वाहतूक, महामार्ग विभाग), अभिषेक कुमार, अवर सचिव (ग्रामविकास विभाग ), करण सरीन, उप संचालक तसेच डॉ. एस. व्ही. एस. पी. शर्मा, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय अंतराळ दूरसंवेदन केंद्र (इस्रो) यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे.

दोन दिवस राज्यभरात दौरे

केंद्रीय पथकासह राज्याच्या विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना सर्व राजशिष्टाचार विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने धाराशिव, सोलापूर, नाशिक, वाशिम या सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांत पथकाचा दौरा होण्याची शक्यता आहे.