मुंबई : तिकीट खिडकी समोर रांगेत उभे न राहता प्रवाशांना सहज रेल्वेचे तिकीट मिळावे, यासाठी मध्य रेल्वे नवनवीन योजना आखते. आता प्रवाशांना जलदगतीने तिकीट मिळण्यासाठी, मध्य रेल्वेने मोबाइल यूटीएस सहाय्यकांची नेमणूक केली असून या कर्मचाऱ्यांद्वारे झटपट तिकीट दिले जाते. या नव्या सेवेमुळे केवळ १५ दिवसांच्या कालावधीत २२.०१ लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले.

एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली, मोबाइल यूटीएस या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र तिकीट खिडकीवरील रांगा कमी होत नसल्याने, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आता मोबाइल यूटीएस सहाय्यक नेमून नवीन उपक्रम हाती घेतला. मध्य रेल्वेने ही सुविधा ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केली.

सीएसएमटी येथे तीन यूटीएस सहाय्यक नियुक्त केले. त्यांना एम-यूटीएस कर्मचारी म्हणून ओळखले जाते. ते एक मोबाइल, एक लहान तिकीट छपाई यंत्र अशा दोन्ही सुविधा घेऊन फिरतात. हे एम-यूटीएस सहाय्यक सीएसएमटीच्या तिकीट खिडकी परिसरात असतात. तिकीट खिडक्यांवरील रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांकडे जाऊन प्रवाशांकडून प्रवास भाडे स्वीकारून त्यांना तत्काळ तिकीट दिले जाते.

एम-यूटीएस कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना तिकीट खिडक्याच्या आत बसून तिकीट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. डिजिटल किंवा रोख अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारातून तिकीट मिळू शकते. एम-यूटीएस सहाय्यकांद्वारे ३१ ऑक्टोबरपासून तिकीट विक्रीला सुरुवात झाली तर, १४ नोव्हेंबरपर्यंत १४,२०१ तिकिटांची विक्रीतून २२.०१ लाखांचे उत्पन्न मिळाले.

भारतीय रेल्वेत नवी दिल्ली, कलकत्ता, बंगळुरू, चेन्नई आणि सीएसएमटी या स्थानकांवर एम-यूटीएस सहाय्यक नेमणूक करण्याची सुरुवात झाली. तिकीट पटकन मिळाण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे वेळ वाचेल. प्रवाशांनी ही सेवा वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले.