मुंबईतील पूर्व- पश्चिम वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असताना कुर्ला रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला गेल्या महिनाभरापासून मध्य रेल्वेने ‘रेड सिग्नल’ दाखवल्याने या प्रकल्पाचे काम एकदा रखडले आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०१४ च्या मुहूर्तावर सांताक्रूझ- चेंबूर जोड रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या योजनेला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
सांताक्रूझ- चेंबूर जोड रस्ता हा गेल्या १० वर्षांपासून काम सुरूच असलेला प्रकल्प आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होण्याचे सात मुहूर्त आतापर्यंत हुकले असून खर्चाचा आकडा ११५ कोटी रुपयांपासून आता ४३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कुर्ला रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी एक ऑक्टोबर २०१३ रोजी वेळ दिली जाईल, असे रेल्वेने म्हटले होते. पण नंतर २० ऑक्टोबरचा दिवस देण्यात आला. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने गर्डर टाकण्यासाठीची सारी जुळवाजुळव केली. पण मध्य रेल्वेने पुन्हा रेड सिग्नल दाखवला. आता एकदा दिवाळी होऊन जाऊ द्या, असा सूर रेल्वेचे अधिकारी लावत असल्याचे समजते.
गर्डर टाकण्यास होत असलेल्या या विलंबामुळे कुर्ला रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. परिणामी सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचा महत्त्वाचा टप्पाच पूर्ण होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी डिसेंबपर्यंत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ‘एमएमआरडीए’ने जाहीर केले होते. त्यानंतर तो मुहूर्त २६ जानेवारीपर्यंत पुढे सरकला. आता रेल्वेच्या अडवणुकीमुळे तोवर तरी काम होते की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.