Central Railway Platform Issues In Monsoon: आज, २० जूनच्या सकाळपासून मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस सुरु आहे. कल्याण- डोंबिवली, बदलापूर, पालघर भागात पावसाने सकाळपासून वेग धरलाय आणि आता दुपारपासून पाऊस अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशा स्थितीत मुंबई मध्ये दरवर्षीप्रमाणे पाणी साचण्याचे, लोकल ट्रेन उशिरा धावण्याचे अहवाल समोर येत आहेत. यंदा मात्र मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये लोकल ट्रेन उशिराने धावतेय यासह अन्य एका मुद्द्यावर तक्रार वजा चर्चा होतेय, तो मुद्दा म्हणजे प्लॅटफॉर्म्सवरून उडालेली छप्परे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकात प्लॅटफॉर्म्सवर छप्पर नसल्याने भरपावसात छत्री घेऊन पळापळ करायला लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. यामुळे ट्रेन पकडताना व ट्रेनमधून उतरताना अडचणी येत असल्याने प्रवासी भडकले आहेत. नेमकी ही स्थिती काय व त्यावर मध्य रेल्वेने काय भूमिका स्पष्ट केली आहे हे सविस्तर जाणून घेऊया..

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची तक्रार काय?

मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांमध्ये सध्या प्लॅटफॉर्म्सवर छप्पर घातलेलं नाही. उन्हाळ्यात सुद्धा यामुळे प्रवाशांना उन्हाच्या झळांचा त्रास सहन करावा लागलाच पण आता पावसाळ्यात खूपच पंचाईत होत आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेवर धावणाऱ्या गाड्या या १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या असतील असा मोठा निर्णय घेण्यात आला होता. डोंबिवलीमध्ये पाचव्या प्लॅटफॉर्मवर जिथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात तिथे आता १५ डब्यांमुळे ट्रेन खूप पुढे थांबते जिथे छप्पर घातलेले नाही. अशीच स्थिती दादर व बदलापूरमध्ये सुद्धा आहे. काही स्थानकांमध्ये जसे की ठाणे, वडाळा, घाटकोपर, मस्जिद इथे एस्केलेटरच्या बांधकामामुळे सुद्धा छप्पर काढून टाकण्यात आले आहे परिणामी भरपावसात प्रवाशांची दैना होते. नेरळमध्ये तर केवळ प्लॅटफॉर्मचा ५ ते १० टक्के भाग हा छप्पर घातलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेची भूमिका काय?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, आपल्याकडे सर्व प्लॅटफॉर्मवर मिनिमम पॅसेंजर Amenities च्या मानकानुसार छप्पर उपलब्ध आहे . प्लॅटफॉर्म्सवर छप्पर न असण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे काही ठिकाणी मुळातच infringement मुळे निमुळते प्लॅटफॉर्म्स आहेत. दुसरं म्हणजे काही ठिकाणी छप्पर नसलेले प्लॅटफॉर्म्स आहेत ते अद्याप वापरासाठी खुले केलेले नाहीत. जसे की दिवा स्थानकात असलेल्या प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यासाठी मार्ग असला तरी त्याला वापरासाठी चालू करण्यात आलेले नाही. तसेच डोंबिवली- दादर मध्ये असणाऱ्या काही प्लॅटफॉर्म्सवर अजून एस्केलेटर बसवण्याचे काम चालू आहे, एस्केलेटरच्या कामाची पूर्तता झाल्यानंतर छप्पर बांधता येऊ शकते. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे.