मुंबई : भारत सरकारने ‘डिजिटल भारत’ला चालना देण्यासाठी रोकड विरहित व्यवहार, संपर्क विरहित व्यवहार आणि ग्राहक सुविधा देण्याच्या उद्देशाने अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल केले. परंतु, या यूटीएस ॲपमध्ये मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या नावाची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
मध्य रेल्वेच्या अख्यत्यारितील ट्रान्स हार्बर मार्ग नोव्हेंबर २००४ रोजी सुरू करण्यात आला. परंतु, या मार्गावरील रेल्वे स्थानकांची नावे चुकीच्या पद्धतीने उच्चारली जात आहेत. लोकलमधील फलकांवर आणि उद्घोषणेत ऐरोली रेल्वे स्थानकाचे नाव ‘ऐरावली’, रबाळे रेल्वे स्थानकाचे नाव ‘राबाडा’, घणसोली रेल्वे स्थानकाचे नाव ‘घनसोली’ आणि कोपर खैरणे रेल्वे स्थानकाचे नाव ‘कोपर खैर्ना’ असे चुकीच्या पद्धतीने नमुद करण्यात येत आहे.
परिणामी, लोकलमधील सूचना फलकावर व इतर ठिकाणी रेल्वे स्थानकांची चुकीची नावे प्रवाशांच्या दृष्टीस पडत आहेत. तर, यूटीएस ॲपवर देखील ऐरावली, राबाडा, कोपरखैर्ना अशा पद्धतीने इंग्रजी नावे लिहिण्यात आली आहेत. या सर्व स्थानकांची नावे रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार, फलाटावर व्यवस्थितरित्या लिहिली आहेत.
मात्र, लोकलमध्ये आणि यूटीएस ॲपवर चुकीच्या पद्धतीने लिहिली जात आहे. त्यामुळे शहर, गावांच्या नावांची छेडछाड सुरू असून हे फार अन्यायकारक आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच या ॲपवर दिवा – वसई मार्गावरील जुचंद्र स्थानकाचे नाव ‘जुईचंद्र’ असे आहे. त्यामुळे यूटीएस ॲपमधील सर्व स्थानकांची नावे दुरूस्त करावी, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
भारतीय रेल्वेमध्ये यूटीएस ॲपचे सर्वाधिक वापरकर्ते मुंबईत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावरील लाखो प्रवासी यूटीएस ॲपचे वापरकर्ते आहेत. त्यापैकी हजारो प्रवासी हे ट्रान्स हार्बर मार्गावरील आहेत. परंतु, रेल्वे स्थानकांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिल्याने, हे ॲप वापरणे प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे. रबाळे स्थानकाचे नाव राबाडा किंवा रबाडा असे दिसून येत असल्याने, समाज माध्यमावर हा चेष्टेचा विषय बनला आहे. परंतु, तरीही मध्य रेल्वेने यात बदल केलेला नाही, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.
