मुंबई : मुंबई महानगरात गुरुवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा मंदावली होती. अनेक लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर, दुपारी १.२५ च्या सुमारास अंधेरी येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. तर, दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास कांजूरमार्ग येथे पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्याने सीएसएमटीला जाणारी लोकल सुमारे २५ मिनिटे खोळंबली होती. परिणामी, सायंकाळी सीएसएमटीवरून सुटणारी डाऊन लोकल बराच वेळ उपलब्ध नव्हती. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
मध्य रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. धीम्या, जलद लोकल गुरुवारी सकाळपासून कूर्मगतीने मार्गस्थ होत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ लोकल प्रवासात वाया गेला. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला होता. परिणामी, मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. वेळापत्रक सुधारण्यासाठी काही लोकल धीम्याऐवजी जलद करवण्यात आल्या. परिणामी, धीम्या मार्गावरील प्रवाशांना धीमी लोकल वेळेत उपलब्ध झाली नाही. तर, दुपारी १.२५ दरम्यान पश्चिम रेल्वेवरील अंधेरी येथे सिग्नल बिघाड झाल्याने, एक लोको इंजिन रेल्वे मार्गावर थांबले. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला. या घटनेमुळे अनेक लोकल पर्यायी मार्गावरून चालवण्यात आल्या.
दुपारी १.४५ वाजता बिघाडाची दुरूस्ती करून लोको इंजिन आणि लोकल मार्गस्थ झाल्या. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील सुमारे ७ लोकल रद्द झाल्या. तर, अनेक लोकल विलंबाने धावत होत्या. तर, दुपारी ३.४५ वाजता मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग येथे टिटवाळा – सीएसएमटी लोकलच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे लोकल सुमारे २५ मिनिटे उभी होती. त्यानंतर पेंटोग्राफची दुरूस्ती करून, दुपारी ४.१३ वाजता लोकल सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली. कांजूरमार्ग येथील बिघाडामुळे अप धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती.
परिणामी, सायंकाळी ४.३० पासून सीएसएमटीवरून डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल उपलब्ध नव्हत्या. रेल्वे स्थानकात वारंवार उद्घोषणा करून लोकल रद्द करण्यात येत होत्या, असे प्रवाशांनी सांगितले. सीएसएमटीवरून सामान्य लोकलसह सायंकाळी ५ वाजता अंबरनाथला जाणारी वातानुकूलित लोकल वेळेत सुरू न झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रत्येक रेल्वे स्थानकात गर्दी झाली होती.