मुंबई : मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची (सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट) लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

‘राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठातीलही केंद्र पालघर, किनवट, मेळघाट, गडचिरोली या क्षेत्रातील आदिवासी समुदायावर संशोधन करून या प्रवर्गाच्या विकासाच्या योजना आणि धोरण निश्चितीसाठी उपयोगी ठरू शकणार आहे’, असे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या ट्रायबल रिसर्च अँड नॉलेज सेंटरशी सामंजस्य करार करून व्यापक स्वरूपात संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, पुरातत्त्वशास्त्र विभाग, मराठी विभाग आणि ट्रायबल रिसर्च अँड नॉलेज सेंटर, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अध्ययन : भारतातील आदिवासी अभ्यासातील संशोधन पद्धती आणि तंत्रे’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या शिफारशी आणि सूचनांच्या अनुषंगाने लवकरच राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार असून राज्यातील इतर विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधक आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.