शिंदे-फडणवीस सरकार योग्य नाही. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष, निवडणूक चिन्ह तयार करून लढावे. मात्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभी केलेली शिवसेनेला फोडू नये, असे आवाहन फायर आजी अशी ओळख बनलेल्या चंद्रभागा शिंदे यांनी केले.खासदार नवनवीन राणा एप्रिल २०२२ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी येणार होत्या. यावेळी अनेक शिवसैनिकांनी राणा यांच्या खार येथील निवासस्थानी तीव्र आंदोलन केले होते. तसेच ‘मातोश्री’ बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्रमांक २०२ मधून आलेल्या ७८ वर्षांच्या आजीचा रौद्ररूप सर्वांनी पाहिला. या आजी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात आल्या होत्या. ‘आम्ही विकले गेलेलो नाही. आमच्यात स्वाभिमान जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेना, ठाकरे परिवारासोबत राहू. शिंदे यांनी शिवसैनिकांची ताटातूट करू नये’, असे त्या म्हणाल्या.
मुस्लिम शिवसैनिकांचीही गर्दी
बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी ठिकठिकाणाहून आबालवृद्ध शिवसैनिक शिवाजी पार्कवर आले होते. त्यामध्ये मुस्लिम धर्मीय शिवसैनिकांची संख्याही लक्षणीय होती. वांद्रे परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने येथे आले होते.शिवाजी पार्कवर होणारी गर्दी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने दादर परिसरातील दुकाने गुरुवारी बंद ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार दादर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर दुकाने बंद होती. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच फेरीवाले दिसत होते.