मुंबई : मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिकवणी शुल्क माफ करण्यात आल्यानंतर आता ८४२ अभ्यासक्रमांचे शुल्क माफ करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाागाने धोरण आखण्यात येत आहे. त्यातच आता ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत विद्यार्थिंनींना दरमहा दोन हजार रुपये कमावण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थिंनींना या पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी करता येणार आहे.

विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून मासिक सहा हजार रुपये देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याआधीच घेतला आहे. या सहा हजार रुपयांची मदत विद्यार्थिनींना घरभाडे भरणे किंवा जेवणखर्च भागवणे यासाठी होऊ शकते. पण त्यापलीकडे जाऊन दैनंदिन खर्चासाठी किंवा शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या हाती पैसे असणे आवश्यक आहे. त्यासाठीच ‘कमवा आणि शिका’ ही योजना आखली जात असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. .

या योजनेचा आराखडा तयार होत आहे. प्रत्येक महाविद्यालय त्यांच्याकडील विद्यार्थिनींना विविध प्रकारचा रोजगार देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच अशा विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मागवली जाईल. ज्या विद्यार्थिनी काम करत आहेत, त्यांच्या खात्यात दरमहा दोन हजार रुपये जमा करण्यात येतील. सुरुवातीला या योजनेचा लाभ पाच लाख विद्यार्थिनींना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दरमहा १०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

ही योजना वर्षभर राबवण्यासाठी किमान एक हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. या निधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाठपुरावा सुरू आहे. पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता तो मंजूर होण्यास काही काळ जाऊ शकतो. तोपर्यंत या योजनेच्या इतर बाबींवर उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करेल, असेही त्यांनी सांगितले.