मुंबई : मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार नवीन लोकल धावतील अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र, नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. उलटपक्षी रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी ६ ते १२ मिनिटे आधीच सोडण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमुद करण्यात आले आहे. परिणामी, ५ ऑक्टोबरपासून शेवटची कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच सीएसएमटीवरून सुटणाऱ्या २२ जलद अप आणि डाऊन लोकल दादरवरून सोडण्यात येणार आहेत. परिणामी, सीएसएमटी, भायखळा येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार लोकल सेवांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – कसारा लोकल दररोज रात्री १२.१४ वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटते. मात्र, ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे. या लोकल अनुक्रमे ६ आणि १२ मिनिटे आधीच सुटणार आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे.

हेही वाचा – राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील २४ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. याशिवाय सीएसएमटी – ठाणे चालवण्यात येणाऱ्या ६ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील गर्दी विभाजित करण्यासाठी २२ अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत आणि त्या दादरवरूनच डाऊन दिशेला रवाना होतील. दादर येथील नवीन फलाट क्रमांक ११ वरून या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा येथे थांबा देण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी सकाळी ८.५६ वाजता कळवा येथे आणि सकाळी ९.२३ वाजता मुंब्रा येथे जलद लोकल थांबेल. तर, गर्दीच्या वेळी सायंकाळी ७.२९ वाजता कळवा येथे आणि सायंकाळी ७.४७ वाजता मुंब्रा येथे जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित केले आहेत.

हेही वाचा – तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका लोकल फेरीचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर

सकाळी ६.०३ च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी ६.०५ वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ७.०४ वाजता पोहचेल.