लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे तैनात तत्कालीन प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघाजणांविरोधात नुकतेच केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी आरोपींवर २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. अलिबाग येथील विशेष सीबीआय न्यायालयात याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

तत्कालीन प्रतिबंधक अधिकारी शैलेंदरकुमार सिंह यांच्यासह दोन खासगी व्यक्तीविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी १२ फेब्रुवारीला सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यात तत्कालीन प्रतिबंधक अधिकारी (निरीक्षक) सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, लाचेची मागणी करणे, लाच स्वीकारणे अशा विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकारी जुलै २०१७ पासून जेएनपीटी येथील कस्टम हाऊसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी बनावट पावत्यांच्या आधारावर एक टोळी कर परतावा मिळवत असल्याची माहिती अधिकाऱ्याला मिळाली होती.

आणखी वाचा-घरफोडीसाठी घरात शिरलेल्या चोराने पळवली गळ्यातील सोनसाखळी, आरोपी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी आरोपीने एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती २५ लाख रुपये व भविष्यात प्रत्येक बनावट पावती स्वीकारण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपीने खासगी व्यक्तीच्या माध्यमातून २५ लाखांची लाच हफ्त्यांमध्ये स्वीकारली. याप्रकरणी सीबीआयने खासगी व्यक्तीचे मोबाइल जप्त केले होते. त्यात लाचेबाबत वसंभाषण सापडले. तसेच लाचेच्या रकमेच्या वितरणाबाबतची माहितीही मिळाली. याप्रकरणी चौकशीनंतर गेल्याआठवड्यात तीन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.