मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात पायातला जोडा फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. गेली अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या राकेश किशोर तिवारी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलाने हे कृत्य केलेले असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केली आहे.
या घटनेचा व्यापक स्वरूपात निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता धडकणार आहे. त्यात धारावीतील चर्मकार समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना ६ ऑक्टोबरला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी या वकिलाने पायातला जोडा फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटले. तिवारी याच्या या कृतीविरुध्द संपूर्ण देशामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेली आहे. या घटनेविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे.
या असंतोषाला मोकळी वाट करुन देणे आणि या घटनेचा व्यापक स्वरूपात निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. सरन्यायाधीशायांवर हल्ल्यांचा प्रयत्न करणाऱ्या ॲड. राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे,तसेच बूट फेकीचा हल्ला झाला तो दिवस म्हणजेच ६ ऑक्टोबर हा दिवस न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
जनमानसात संविधानाप्रती जागृती व आदर असावा यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयाच्या प्रांगणामध्ये हातामध्ये संविधान असलेला महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. देशातील प्रत्येक न्यायालयातील न्यायाधीशांना कडक सुरक्षा देण्यात यावी. देशाच्या व राज्यांच्या राजशिष्टाचारानुसार प्रत्येक न्यायाधीशाचा सन्मान ठेवण्यात यावा. या सह इतर महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केल्या असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी सांगितले.
राकेश किशोर तिवारी यांनी हल्ल्याचा केलेला प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो या देशाच्या संविधानावर व संविधान द्वारा स्थापित न्यायव्यवस्थेवर आहे. हे कृत्य अतिशय निंदनीय व अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. संबंधित घटनेमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी सदर घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी यावी. अशी मागणी बाबुराव माने यांनी केली आहे.