मुंबई : मतांची चोरी राज्यात किंवा देशात कोठेही झालेली नाही. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असून हार्डडिस्क करप्ट झाली आहे, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. त्यामुळेच राहुल गांधी हे त्याच गोष्टी रोज बोलत आहेत आणि खोटे बोलून पळून जात आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी पुन्हा आरोपांची तोफ डागली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी हे रोज वेगवेगळे आकडे देत आहेत. महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ते राज्यात एक कोटी मतदार वाढले आहेत, असा दावा करीत आहेत. प्रत्येक वेळी काहीतरी नवे सांगून ते लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनाधार आता संपला असल्याचे त्यांच्या लक्षात आले असून बिहारमध्येही ते निवडून येणार नाहीत. महाराष्ट्रातील पुढील निवडणुकाही त्यांना यश मिळणार नाही, याची जाणीव असल्याने ते आधीच अशी वातावरण निर्मिती करीत आहेत.

बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणांनाही राहुल गांधी विरोध करीत आहेत, मग यादी दुरुस्त कशी होईल, असा सवाल फडणवीस यांनी केला. राहुल गांधी सातत्याने खोटे बोलत आहेत व चुकीची विधाने करीत आहेत. देशातील संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम राहुल गांधी करीत असून जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.

काँग्रेसने मतदारांचा अपमान बंद करावा : आशिष शेलार</strong>

काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालविलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टीकाच करायची असेल तर प्रथम विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असे प्रत्युत्तर मुंबई भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि स्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राहुल गांधींना दिले आहे. जनतेने मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पचविता आलेला नाही, असा टोला शेलार यांनी लगावला. मतदार याद्या आणि मतदान प्रक्रियेवर गळे काढणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधकांनी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर आक्षेप घेतला नव्हता. तेव्हा केवळ ३९०० आक्षेप दाखल झाले होते त्यातील केवळ ९८ आक्षेप वैध ठरले होते, असे शेलार यांनी नमूद केले.

शेवटच्या टप्प्यात मतदान वाढले, असे गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिवसभराची दर तासाची आकडेवारीही सांगावी, ती का लपवली जाते, असा सवाल शेलार यांनी केला. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्याला प्रतिसाद मिळाला. त्यात चुकीचे काय ? वाढलेल्या मतदानाचा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फायदा झालेला चालतो, पण विधानसभा निवडणुकीत नाकारले, तर चालत नाही, याचे आश्चर्य वाटते, असे शेलार यांनी स्पष्ट केले.