BKC to Acharya Atre Chowk Metro Launch : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अ च्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार येत्या एक- दोन दिवसात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक या टप्पा २ अ च्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरु आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या टप्प्यामुळे आरे ते बीकेसी प्रवास गारेगार आणि अतिजलद झाला आहे.

असे असले तरी या टप्प्यास अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आता मात्र तेथील प्रवासी संख्येत वाढ होण्याची आशा एमएमआरसीला आहे. कारण आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी असा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने त्याला विलंब झाला. पण आता मात्र हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील एक-दीड महिन्यांपासून या टप्प्यासाठी सीएमआरएस चाचण्या सुरु होत्या. या चाचण्या यशस्वी झाल्या असून या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती एमएमआरसीतील सूत्रांनी दिली आहे. सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाचे लोकार्पण येत्या एक-दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.

त्यातही उद्या, शुक्रवारी दुपारी १ वाज मुख्यमं त्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची चर्चा आहे. लाकार्पण झाल्यानंतर शनिवारपासून ही मार्गिका प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.एमएमआरसीकडे यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र लोकार्पण उद्या होणार का यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.