मुंबई: राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण कळीचा मुद्दा बनू लागला असून वाढते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी परिवहन विभागाकडून रस्ते ‘सुरक्षा अभियाना’चे आयोजन करण्यात येते. नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात येणार होती. केवळ अर्ध्या तासाच्या या नियोजित कार्यक्रमासाठी तीन तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्री आले नाहीत. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. यामुळे कंटाळलेले अभिनेते जॅकी श्राॅफ यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविलेले परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थांचाही हिरमोड झाला. अखेर कार्यक्रमासाठी आलेले राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली. परिवहन विभागाच्या ‘राज्य रस्ते सुरक्षा अभियान २०२३’ला ११ जानेवारीपासून करण्यात आली आहे. हे अभियान राज्यात सात दिवस चालणार आहे. परिवहन विभागतर्फे राज्यात विशेष कारवाई, जनजागृती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अभियानाचे उद््घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ११ वाजता एनसीपीए सभागृहात करण्यात येणार होते. मात्र मंगळवारपासूनच या कार्यक्रमाच्या वेळेत सातत्याने बदल करण्यात आला.

हेही वाचा >>> भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

मुख्यमंत्र्यांसाठी बुधवारी कार्यक्रमाची वेळ दुपारी २ वाजता निश्चित करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होणार होता. पुन्हा त्यात बदल होऊन नंतर दुपारी १२ वाजताची वेळ ठरली. अखेर ११.३० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली. या कार्यक्रमाला केवळ परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारीच नव्हे, तर स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामुळे एनसीपीए सभागृह पूर्णपणे भरले होते. सभागृहाबाहेर काही आरटीओंनी जनजागृही करणारे स्टाॅल्सही उभारले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते जॅकी श्राॅफ वेळेत हजर झाले होते.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची सुटका, सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री येण्यापूर्वी जॅकी श्राॅफ यांनी रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मागदर्शन केले. मात्र बराच वेळ होऊनही मुख्यमंत्री न आल्याने आणि मुख्य कार्यक्रम सुरू होण्यासही विलंब झाल्याने जॅकी श्राॅफ निघून गेले. तर अनेक अधिकारी, कर्मचारी मोबाइलमध्ये व्यस्त होते. तर काहींचा गप्पांचा फडच रंगला होता. महाविद्यालयीन विद्यार्थीही कंटाळले होते. त्यामुळे अनेकांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. सभागृहातील अर्धाहून अधिक खुर्चा रिकाम्या झाल्या. अखेर २.४५ च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आले आणि त्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. काही तातडीच्या कामांमुळे मुख्यमंत्री रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. या कार्यक्रमाला उशिर होऊ नये म्हणून त्यांनी त्वरित मला या कार्यक्रमाला पाठविले. या कार्यक्रमाला येण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. पण अन्य कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत, असे स्पष्ट करून देसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या अवघ्या अर्ध्या तासांतच हा कार्यक्रम आटोपला.