मुंबई: झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सर्व इमारतींचे आग प्रतिबंधक सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त केला जाईल. इमारतींचे सर्वेक्षण आणि संरचनात्मक परिक्षण केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) गोरेगावच्या उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांना केंद्र व राज्याची अशी एकत्रित सात लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीतून परतल्यावर मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली व जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणाचा मृ्त्यू झाला असून जखमींवर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्रॉमा केअर सेंटर येथे भेट घेऊन जखमींची विचारपूस केली. तसेच गोरेगाव येथील घटनास्थळीही भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा >>>सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बॉम्ब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
सर्व ‘झोपु’ इमारतींचे परिक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. इमारतींचे सर्वेक्षण आणि संरचनात्मक परिक्षण केले जाईल अशी माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी खासदार गजानन किर्तीकर, महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल उपस्थित होते. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे पाच लाख तर पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.