मुंबई : बहुजमली इमारतीच्या उद््वाहनात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याची आणखी एक घटना पूर्व उपनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहत असून उद््वाहनात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने हे विकृत कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलगी ११ वर्षांची आहे. ती आपल्या पालकांसह पूर्व उपनगरांतील एका बहुमजली इमारतीच्या १४ व्या मजल्यावर राहते. दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर ती उद््वाहनाने घरी जाते. ती बुधवार, ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी शाळेतून घरी जात होती. नेहमीप्रमाणे ती उद््वाहनात शिरली.

त्यावेळी तिच्या शेजारील सदनिकेत राहणारा ५० वर्षीय आरोपी उद््वाहनात आला. उद््वाहनात अन्य कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकाराने मुलगी खूप घाबरली. शेजारी राहणाऱ्या काकांनी उद््वाहनात घाणेरडे कृत्य केल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितले. तिच्या पालकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाची तक्रार केली.

आरोपीला अटक, रहिवाशांमध्ये संताप

या घटनेमुळे मुलगी रहात असलेल्या इमारतीमधील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीचे पालक आणि अन्य रहिवाशांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ५० वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली.