‘लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट’मध्ये बुधवारी यशवंत नाट्य मंदिर येथे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मराठी रंगभूमी दिनी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. नाट्यपरिषदेच्या स्पर्धेत एकांकिका पाहिल्यानंतर व्यावसायिक नाटक करण्याचे ठरवले आणि अवघ्या काही दिवसांतच नाटकाचा प्रयोग सादर झाला याचा आनंद वाटतो, अशा शब्दात ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या भावना प्रयोगानंतर व्यक्त केल्या.
प्रयोगाच्या मध्यांतरात नाटककार, दिग्दर्शक विनोद रत्ना, प्रमुख भूमिकेतील श्रेयस जोशी, समृद्धी कुलकर्णी, वैभव रंधवे, निर्माते श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सारस्वत बँकेचे अनिल अंबेस्कर, केसरी टूर्सच्या सुनीता पाटील, कौटिल्य मल्टीक्रीएशनचे विनोद महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक विनोद रत्ना यांनी जाणते आणि प्रथितयश नाट्यकर्मी असूनही आम्ही नवखे आहोत, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी कधीही जाणवू दिले नाही, असे आवर्जून नमूद करत ‘लोकसत्ता लिटफेस्ट’मध्ये शुभारंभ करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
नात्यांमधील गुंता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सोडविणार का असा अनोखा विषय असलेल्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग संपताना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत नाटक आवडल्याची पावती दिली. ‘कलादर्शन, पुणे या संस्थेची मूळ एकांकिका नाट्य परिषदेच्या स्पर्धेत यशवंत नाट्य मंदिरात अठरा सप्टेंबरला पाहिली आणि तेव्हाच याचे व्यावसायिक नाटक करावे असे ठरवले. नाटककार, दिग्दर्शक विनोद रत्ना यांनीही तयारी दर्शविली आणि अवघ्या काही दिवसातच आज या नाटकाचा प्रयोग सादर झाला याचा निश्चितच आनंद वाटतो, अशा शब्दात नाटकाचे प्रस्तुतकर्ता चंद्रकांत कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.
प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसाद लाभलेल्या या प्रयोगाला अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, मीना नाईक, कवयित्री नीरजा तसेच नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक एकांकिकेचे नाटक होतेच असे नाही
प्रत्येक एकांकिकेचे नाटक होतेच असे नाही. पण यात ती क्षमता आहे असे जाणवले. विनोद रत्ना आणि ‘कलादर्शनच्या संपूर्ण चमूनेच नाटक करावे, असे मी सुचवले. त्यानुसार नाटकाची सर्व अंगं या टीमनेच जबाबदारी पेलून पूर्ण केली आहेत हे शुभारंभ प्रयोगानिमित्त सर्वांना कळावे म्हणून नमूद करतो, असे चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.
एकांकिका ते व्यावसायिक रंगभूमी
नेपथ्य, प्रकाशयोजना आणि तांत्रिक बाजू अधिक चांगल्या करण्यासाठी ‘कलादर्शन’च्या चमूला शीतल तळपदे, प्रदीप मुळ्ये, मी, प्रशांत दळवी यांनी मार्गदर्शन केले. एकांकिका ते व्यावसायिक रंगभूमी असा हा प्रवास प्रयोगापर्यंत आणून सादर करण्यासाठी ‘अभिजात लिटफेस्ट’सारखे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले.
