मराठी माणसाचे हक्काचे ठिकाण म्हणून आजही लालबागचे नाव घेतले जाते. काही दशकांपूर्वी मुंबईतील लालबाग या परिसरात सर्वाधिक कापड गिरण्या होत्या. गिरण्या सुरू होत्या, तोपर्यंत ही सर्व मराठी माणसे आनंदाने नांदत होती. गिरण्यांवरच या कुटुंबीयांची गुजराण व्हायची. त्यादरम्यान साताऱ्याचे श्रीरंग कदम यांनी लालबाग या परिसरात चिवडय़ाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी अगदी काही किलोंचा मालमसाला विकत घेऊन त्यांनी लालबागमधील नारायण पेठे या रस्त्यावर एक गाळा भाडय़ाने घेतला आणि तेथेच ‘टेस्टी चिवडा’ नावाचे दुकान सुरू केले. या परिसरातील किराणा दुकानांच्या गर्दीमध्ये चिवडय़ाचे दुकान दिमाखात होते. त्यामुळे टेस्टी चिवडय़ाच्या दुकानात कामगारांची मोठी गर्दी होत होती. १९६० ते १९६२ या काळात लालबागमधील चिवडय़ाचे हे एकमेव दुकान होते. हळूहळू हा व्यवसाय वाढत गेला. आज या भागालाच चिवडा गल्ली हे नाव पडले आणि येथे चिवडय़ाचा बाजारच उभा राहिला.
चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून साधारण ५०० मीटर अंतरावर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ आहे. त्याच्या पुढे दोन गल्ल्या सोडून चिवडा गल्लीची पाटी दिसते. त्या पाटीच्या उजव्या दिशेला चिवडा, सुका खाऊ, फरसाण, वेफर यांच्या दुकानांची मोठी रांग दिसते. या रस्त्यावरून चालताना पोहे भाजल्याचा खमंग गंध नाकात दरवळतो. छोटय़ा कारखान्यात पोहे भाजण्याचे काम सुरू असते. कदम यांनी पहिल्यांदा या परिसरात टेस्टी चिवडय़ाचे दुकान सुरू केले. इतक्या वर्षांत आजही या दुकानाच्या शेजारीच छोटय़ा अंधाऱ्या खोलीत चिवडा तयार केला जातो. सध्या या बाजारात फरसाण, मक्याचा चिवडा, कचोरी, बटाटय़ाचे वेफर, मिठाई हे पदार्थही मिळतात. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारची सरबतेही येथे विक्रीस उपलब्ध आहे. मात्र चिवडा गल्लीचे वैशिष्टय़ हे इथला पोह्य़ांच्या चिवडय़ामध्ये असते. गिरण्या सुरू होत्या, त्या वेळी या परिसरात चिवडा खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत होती. अगदी मुंबईच्या उपनगरातून चिवडाप्रेमी खरेदी करण्यासाठी येत होते. मात्र गेल्या काही वर्षांत ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वीच्या काळात ग्राहक येथूनच वर्षभरासाठी चिवडा घेऊन जात होते. सकाळी व संध्याकाळच्या नाश्त्याची सोय किंवा आलेल्या पाहुण्यांच्या ताटात चिवडा-लाडूच सजवले जात होते, तर सध्या बच्चेकंपनीही चिवडय़ाच्या फार प्रेमात नसल्याचे दिसते. त्यामुळे सध्या वर्षभरासाठी चिवडा घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे केवळ चिवडय़ावर अवलंबून न राहता मिठाई, विविध प्रकारची सरबते, बटाटय़ाचे वेफर, कचोरी, शेव, खारी बुंदी हे पदार्थही विक्रीस ठेवले असल्याचे दुकानदार सांगतात. गेल्या काही वर्षांत येथे सरबतांचा बाजार वाढला आहे. अगदी कैरी पन्हे, हापूस, जिंजर लेमन, आवळा, खस, पेरू, जांभूळ, बडीशेप, कोकम, लिची, गुलाब यांची सरबते मिळतात.
चिवडा गल्लीत फिरताना तुम्हाला चिवडय़ांच्या खमंग गंधाबरोबर नाकात शिरणारा मसाल्याचा वासही येतो. येथे खामकर यांच्या दुकानाला लागूनच मसाला तयार करण्याचा छोटासा कारखाना आहे. आजही अनेक कुटुंबीय घरात वर्षभरासाठी मसाला साठवून ठेवतात. मुंबईतील बहुतांश कुटुंबे लालबागला येऊन वर्षभरासाठी मसाला तयार करून घेतात. लालबागमध्ये राहणारी अधिकतर कुटुंबे कोकणातील असल्याने येथे मालवणी मसाला हमखास मिळतो. मात्र बाजाराची आवश्यकता लक्षात घेता येथे गोडा मसाला, घाटी मसाला, तिळकूट यांसारखे अनेक पदार्थ मिळतात.
सध्या चिवडा गल्लीत २३ ते २५ दुकाने आहेत. मुंबई व उपनगरातील छोटे विक्रेते या परिसरात येऊन चिवडा व तत्सम पदार्थ विकत घेतात. सुरुवातीला येथे ५ रुपये किलोने चिवडा विकला जात होता. सध्या हा चिवडा ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याबरोबर मक्याचा चिवडाही ६० ते ७० रुपये किलोपर्यंत विकला जातो. मुंबईतील मशीद बंदर, भायखळा, दादर या बाजारभागांत येथील चिवडा विकला जातो. त्याशिवाय सातारा-सांगली, पुणे येथेही हा चिवडा नेण्यात येतो. रात्रभर या दुकानात चिवडा तयार केला जातो व सकाळी गाडय़ांमधून हा माल मुंबईभर पाठविला जातो. अनेकदा या टेस्टी चिवडय़ाच्या दुकानात दिवसाला १५० ते २०० किलो चिवडाही तयार होतो, तर इतर वेळी दिवसाला साधारण ३० ते ४० किलो चिवडा तयार केला जातो. या गल्लीतील केवळ टेस्टी चिवडा व लक्ष्मी या दुकानाचे मालक पोह्य़ांचा चिवडा बनवितात. त्यांच्याकडून इतर दुकानदार किरकोळ भागात चिवडा विकत घेतात. हा व्यवसाय छोटय़ा गल्लीमध्ये जरी होत असला तरी महिन्याकाठी या एका दुकानदाराची उलाढाल काही लाखोंमध्ये होते आणि संपूर्ण बाजाराचा विचार केला तर ही उलाढाल काही कोटींपर्यंत जाते.
मीनल गांगुर्डे MeenalGangurde8@ gmail.com