मुंबई: अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करण्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले असताना आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण जागांपैकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुलैपासून वर्ग सुरू करण्याची मुभा शिक्षण संचालनालयाकडून शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. तशा सूचना सर्व शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण संचालकांना देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार यंदा राज्यातील अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश होईपर्यंत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमुळे दरवर्षी अकरावीचे वर्ग सुरू होण्यास विलंब होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता यंदा अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपूर्वी सुरू करण्याची मुभा शिक्षण संचालनालयाने दिली आहे. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेश क्षमतेपेकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुले २०२५ यापैकी जे प्रथम होईल, त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करता येणार आहेत.
शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेल्या या परवानगीमुळे १ जुलै २०२५ पासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, तशा सूचना शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, सहाय्यक संचालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण निरीक्षक मुंबई यांना देण्यात आल्या आहेत.