दिवसाच्या तापमानातील फरक २१ अंशांवर
एकीकडे सकाळी गुलाबी गारव्याची मजा घेत असतानाच दुपारी मात्र उकाडा वाढत आहे. कोरडय़ा हवेमुळे मुंबईतील किमान व कमाल तापमानातील फरक २१ अंश से. हून अधिक झाला आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे किमान १३.३ अंश से. तर कमाल ३४.४ अंश से. तापमान नोंदले गेले.
समुद्रकिनारी असलेल्या मुंबईतील दिवसा व रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. पावसाळ्यात तर हा फरक अवघ्या पाच ते सहा अंश से. वर येतो. समुद्रावरच्या दमट हवेचा प्रभाव असलेल्या मुंबईत थंडीत मात्र कोरडे वारे अधिक प्रभावी ठरतात. बाष्पाअभावी तापमान धरून ठेवण्याची हवेची क्षमता कमी होते. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहत नाही व तापमानातील फरक वाढत जातो. या मोसमात मात्र पहिल्यांदाच दिवसातील तापमानाचा फरक २१ अंश से. हून अधिक झाला आहे. सकाळचे तापमान पुन्हा सातत्याने घसरत असतानाच दुपारच्या तापमानात मात्र वाढ होत आहे. रविवारी आणि सोमवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४ अंश से. वर गेले.
त्यामुळे दुपारचा उकाडा वाढला आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला उत्तरेकडून थंड वारे येत होते. मात्र आता पुन्हा एकदा पूर्वेच्या दिशेने तुलनेने उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे दुपारी तापमान वाढत असल्याचे मुंबई वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव म्हणाले.
नांदेडकरांना हुडहुडी
मुंबईतील किमान तापमान रविवारच्या तुलनेत एक अंश से. ने कमी झाले असले तरी सोमवारी राज्यातील थंडी काहीशी कमी होती. सर्वात कमी तापमान नांदेड येथे ७ अंश से. राहिले. पुण्यात ९, महाबळेश्वर येथे १३.७, नाशिकमध्ये १०.७ तर नागपूरमध्ये १०.४ अंश से. तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेने सांगितले.