बनावट विग दिल्याने क्लिनिकला दंड; आठ वर्षांनंतर महिलेच्या लढय़ाला यश
केसांचा खराब टोप देऊन टोपी लावणे टोपवाल्याला चांगलेच महागात पडले आहे. कांदिवली येथील महिलेने तब्बल आठ वर्षे या विरोधात दिलेल्या लढय़ामुळे खार येथील क्लिनिकला ३७ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
या महिलेने २००८ मध्ये विगसाठी १८ हजार रुपये मोजले होते. त्याची नुकसानभरपाई म्हणून १७ हजार, तर खराब विग मिळाल्यामुळे झालेल्या मन:स्तापासाठी १० हजार आणि कायदेशीर लढाईसाठी आलेल्या खर्चासाठी १० हजार असे एकूण ३७ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
ग्राहक न्यायालयातील तक्रारीनुसार १३ मे २००८ रोजी तक्रारदार महिला खार येथील ‘बेर्कोविट्स कॉस्मेटिक अॅण्ड स्कीन क्लिनिक’ मध्ये विग घेण्यासाठी गेली होती. पसंतीच्या विगची निवड केल्यानंतर तो बनवून घेण्यासाठी तिने माप दिले होते. त्याचवेळेस तिने त्याचे १८ हजार रुपयेही क्लिनिकमध्ये जमा केले. परंतु काही दिवसांनंतर जेव्हा तिला विग मिळाला, तो तिने पसंत केलेल्यासारखा नव्हता. शिवाय तो तिला नीट बसतही नव्हता. त्यामुळे तिने तो घेण्यास नकार दिला. परंतु तो काही दिवस वापरा आणि आवडला नाही तर क्लिनिकतर्फे दुसरा विग देण्यात येईल, असे सांगत क्लिनिकतर्फे तो तिच्या हाती थमावण्यात आला. कुठलाही पर्याय न उरल्याने तक्रारदार महिलेने विग घेतला आणि वापरण्यास सुरूवात केली. मात्र विग वापरण्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे तीन महिन्यांनी ती पुन्हा क्लिनिकमध्ये गेली. त्या वेळेस विग बदलून देण्यासाठी अतिरिक्त पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे तिने आगाऊ रक्कम म्हणून एक हजार रुपयेही भरले. त्यानंतर नवीन विग आणण्यासाठी ती पुन्हा क्लिनिकमध्ये गेली असता तिला नवा विग देण्यात आला नाहीच, उलट जुन्याच विगमध्ये बदल करून तो तिच्या माथी मारण्यात आला. क्लिनिकच्या या सावळ्या गोंधळामुळे कंटाळलेल्या तक्रारदार महिलेने पैसे परत करण्याची मागणी केली. ती क्लिनिकतर्फे फेटाळून लावण्यात आल्यावर तिने ग्राहक न्यायालयात धाव घेत तक्रार नोंदवली. तसेच १९ हजार रूपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. क्लिनिकने न्यायालयात बाजू मांडताना मात्र तक्रारदार महिलेने विग स्वीकारल्याचा आणि तिला त्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचा दावा केला. शिवाय दोन महिन्यांनी ती जेव्हा विग बदलून घेण्यासाठी आली तेव्हाही तिला नवा विग देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
न्यायालयाने मात्र तक्रार मान्य करत क्लिनिकला सेवेत कुचराई केल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवले. विग खरेदीसाठी आणि बदलून घेण्यासाठी मागण्यात आलेल्या रक्कमेतील तफावत न पटण्यासारखी असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. शिवाय विग बदली करून देण्याच्या देयकामध्ये पैसे नेमके कशासाठी घेण्यात आले याचा उल्लेख नसल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधत क्लिनिकला सेवेत कुचराई केल्याप्रकरणी दोषी ठरवून नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2016 रोजी प्रकाशित
टोपवाल्याने ‘टोपी’ घातली, महिलेला ३७ हजारांची भरपाई
न्यायालयाने मात्र तक्रार मान्य करत क्लिनिकला सेवेत कुचराई केल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-08-2016 at 01:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clinic at khar pay 37 thousand as fine for giving fake wig to women