मुंबई : राज्यात पारदर्शक पद्धतीने ४० हजार पोलिसांसह सुमारे एक लाख नोकरभरती करण्यात आली. प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असून त्यानंतर पुढील वर्षी विविध विभातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा महाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही घोषणा युवक वर्गाला आकर्षित करणारी ठरणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या समारंभात सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. शासकीय सेवेत आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार,सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा आदी उपस्थित होते.
राज्य प्रशासन अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी सरकारने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिल्याचे सांगून मु्ख्यमंत्री म्हणाले, राज्य लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समितीच्या माध्यमातून विविध राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. राज्याचे प्रशासन हे संस्थात्मकदृष्ट्या बळकट करण्याबरोबरच ते गतिशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी १०० दिवसांचा आणि नंतर १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सेवा नियम बदलणार
अनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम ५० वर्षे जुने होते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अगदी लिपिकापासून ते वरच्या स्तरापर्यंत पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत, पण नियमांमध्ये बदल झाले नव्हते. रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला.अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्या, अनेक पात्र कुटुंबे, ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मुले आणि पत्नी यांचा समावेश होता. याबाबतचे सर्व शासन निर्णय बदलून एक सुटसुटीत आणि सोपा शासन निर्णय तयार केला. अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यास, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केले. याच बदलांमुळे आज ८० टक्के अनुकंपाच्या जागा भरल्या गेल्या आहेत, आणि उर्वरित २० टक्के जागाही लवकरच भरल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
२६ / ११ मधील शहिदाच्या कन्येला नोकरी
अनुकंपा यादीत आज शहीद उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती देण्यात आली. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्याच्या मुलीला इतक्या वर्षांनी न्याय देऊ शकलो, हे महत्त्वाचे आहे. अनुष्का बी-फार्म असल्याने तिला ‘औषध निर्माता गट ब’ हे पद अनुकंपावर मिळणे नियमांमुळे कठीण होते, कारण ते पद लोकसेवा आयोगाच्या अखत्यातील होते. पण, आम्ही लोकसेवा आयोगाला विशेष विनंती करून नियमात शिथिलता मिळवली आणि तिला न्याय दिला. अनुष्काला न्याय मिळवून दिल्याचा आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
.
पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. आज नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या १० हजार ३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३ हजार७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून, २ हजार ५९७ विदर्भातील आहेत. पुणे विभागात १६७४ नाशिक विभागात १२५०,तर मराठवाड्यातील १७१० उमेदवारांना नियु्क्ती देण्यात आली.
निवडणुका आणि महाभरती
निवडणुका जवळ आल्यावर तरुण वर्गाला आकर्षित करण्याकरिता नोकरभरतीची घोषणा करण्याची प्रथाच हळूहळू रुढ होऊ लागली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ७५ हजार सरकारी पदे भरण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यातील किती पदे भरली याची वेगवेगळी आकडेवारी सादर करण्यात आली. तत्पूर्वी, २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही नोकरभरतीची घोषणा झाली होती. तेव्हा महापोर्टलवरून झालेली नोकर भरती वादग्रस्त ठरली होती. कारण त्यात गैरप्रकार झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या.