मुंबई : शक्तिपीठ महामार्ग उभारणारच, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अडचणींच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शक्तिपीठ महामार्गाला अनेक ठिकाणी आणि विशेषत: कोल्हापूर परिसरात जोरदार विरोध होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरू असून नुकताच रास्ता रोकोही करण्यात आला. या महामार्गासाठी अनेक सुपीक जमिनी जाणार असून त्यांना कमी मोबदला मिळत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या प्रकल्पाला जमिनी देण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही.
या महामार्गासाठी सांगलीपर्यंत जमीन देण्यासाठी फारसा विरोध नाही. कोल्हापूर परिसरात शेतकऱ्यांचा विरोध आहे. पण या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या पट्ट्यात जलसंधारण करण्यात येणार असून त्यामुळे दुष्काळी भागाला मदत होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे काम हाती घेतल्यावर विरोध होतोच. पण विरोधामुळे राज्याचा विकास होणार नाही. शक्तिपीठ महामार्गाला जनतेचा मोठा पाठिंबा असून काही राजकीय नेते या मुद्द्यावर राजकारण करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.