मुंबई : लहानपणी दिवसाची सुरूवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून होई. विविधभारती वाहिनीची गाणी न चुकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळता आले. रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाही, पण सचित्र दर्शन शब्दांमधून घडते. संभाषण एकतर्फी असूनही रेडिओने अभिव्यक्तीला आवाज दिला आणि संस्कृतीला आकार दिला. रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओच्या आठवणींना उजाळा दिला.
जागतिक संगीत दिनानिमित्त यंदा प्रथमच ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ व ‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळ्याचे शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. पहिला आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगितकर विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. या सोहळ्यात विविध १२ रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले. राज्यात १६ रेडिओ वाहिन्या, ५८ कम्युनिटी रेडिओ वाहिन्या व ६० केंद्र अस्तित्वात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहा रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. रेडिओवर संगीत ऐकणे, गाणे लिहीणे, कविता करणे आदी छंदाविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शिघ्र कविता सादर करत गाणे गायले. संगीत आपल्या संवेदनांना जिवंत करते. आम्ही राजकारणी लोक खडूस दिसतो. पण आतून खूप चांगले लोक आहोत. त्याचे श्रेय संगीताला जाते, असेही ते म्हणाले.
संगीत मानवामध्ये संवेदनशीलता आणते आणि तणावमुक्त करते. मन:स्थिती बिघडल्यास हमखास संगीत ऐकावे. मन शांत होऊन विचारक्षमता विकसित होते. रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओच्या कार्यक्रमांना जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. रेडिओचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, असे फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, गायक सुदेश भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.
आठवले घराण्याचा कवी
मॉडेलिंग हा अपघात होता. मित्राने माझ्यासोबत केलेली थट्टा होती. सुदैवाने मी त्यातून वाचलो. त्यांनतर मी कधीही हिंमत केली नाही. कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो. कवी संमेलनात जायचो. अगदी लहान असताना काही कविता लिहिल्या होत्या. लिहिल्यानंतर ते साठवून ठेवले नाही. जेव्हा वाटले तेव्हा लिहायचो. स्वत: वाचायचो. तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, अशी मार्मिक टिप्पणीही फडणवीस यांनी केली.
तुमच्यात कायम असेन
मी दहा वर्षांची असताना चित्रपटासाठी पहिले गाणे ध्वनीमुद्रीत केले. रेडिओ नसता तर कोणताच गायक कुणाला माहिती झाला नसता. रेडिओवर जुनी गाणी लावली पाहिजेत. आपले संगीत, आपली संस्कृती नव्या पिढीला कळली पाहिजे. भारतीय संगीत नवी पिढी शिकेल, असे प्रयत्न रेडिओने केले पाहिजेत. मी गेले तरी रेडिओमुळे तुमच्या असेन, असे आशा भोसले म्हणाल्या.