मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) थेट उत्तर प्रदेशमधील आग्र्यात लाल किल्ल्यावर जाणार आहेत. ते शिवजयंतीनिमित्त सकाळी पुण्यात होते. त्यानंतर एकनाथ शिंदे दुपारी कोल्हापूरमध्ये आणि शेवटी रात्री आग्रा येथे जातील. ते आग्र्यात शिवजन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिवसभराच्या पुणे-कोल्हापूर-आग्रा दौऱ्यानुसार ते सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यासाठी
पुण्यातील जुन्नर तालुक्यात किल्ले शिवनेरी येथे गेले. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवसृष्टीच्या प्रथम चरणाच्या लोकार्पण सोहळ्याला पुण्यातील आंबेगाव येथे गेले.

दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेले. दुपारी अडीच वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे. दुपारी सव्वा तीन वाजता ते केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर द न्यू एज्यूकेशन सोसायटी कोल्हापूर शताब्दी महोत्सव समारोप समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन समारंभासाठी कोल्हापूरमधील लोहिया हायस्कूल येथे उपस्थित राहतील.

सायंकाळी पावणेपाच वाजता मुख्यमंत्री शिंदे पंचमहाभूत लोकोत्सव महाशोभा यात्रेत सहभाग होतील. हा कार्यक्रम कोल्हापूरमधील गंगावेश ते पंचगंगा घाट परिसरात होईल. सायंकाळी साडेपाच वाजता ते पंचगंगा घाट येथे आगमन व पंचगंगा महाआरतीला उपस्थिती लावतील.

हेही वाचा : शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर संभाजीराजेंची जाहीर नाराजी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरमधील कार्यक्रम आवरून मुख्यमंत्री शिंदे आग्र्यासाठी रवाना होतील. रात्री ९ वाजता ते आग्रा येथील लाल किल्ल्यात प्रथमच आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमास उपस्थिती लावतील. दिवान-ए-आम, लाल किल्ला (आग्रा) येथे हा कार्यक्रम होईल.