मुंबई : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केल्यास त्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करेल आणि त्यास निर्णयास स्थगिती मिळवेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिला.

महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये २०१९ मध्ये झालेल्या करारानुसार १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५१७ मीटरपेक्षा कमी ठेवायचा आहे. पण कर्नाटक सरकारकडून कराराचे पालन केले जात नसल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊन तेथील जनतेला मोठा त्याचा फटका बसतो. आताही अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. त्यामुळे तसा निर्णय झाल्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सरकारचा निषेध

बंगळुरुतील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव बदलून सेंट मेरी केल्याबद्दल फडणवीस यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. तेथील काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकप्रकारे अपमानच केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापासूनच आहे. त्यांनी आपल्या ‘ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ’ पुस्तकातही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे लिखाण केले होते, अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित

नेपाळमध्ये अराजक माजल्याने तेथे पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार परत आणत आहे. त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश असून ते सुरक्षित आहेत आणि त्यांना केंद्र सरकारकडून सुखरुपपणे परत आणण्यात येत आहे. या पर्यटकांशी राज्य सरकारची यंत्रणाही संपर्कात असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.