कॅम्पा कोला कंम्पाऊंड इमारत प्रकरणाने गृहबांधणी उद्योग क्षेत्रात प्रभावी नियामक यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित केली आहे, यामुळे महाराष्ट्र विधी मंडळाच्या उभय सभागृहानी समंत करून केंद्र सरकारकडे पाठविलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण (नियंत्रण व विकास) विधेयक २०१२ ला राष्ट्रपतींची तातडीने मंजुरी घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री डॉ. गिरीजा व्यास यांना पत्राद्वारे केली आहे.
डॉ. व्यास यांना लिहिलेल्या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की, कॅम्पा कोला कंपाऊंड प्रकरणामध्ये विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करण्याचे प्रकार घडले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर रहिवाशांकडून जी प्रतिक्रीया उमटली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये गृहबांधणी क्षेत्रात प्रभावी नियामक व्यवस्था असणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार याबाबत एक अतिशय शक्तीशाली आणि विस्तृत कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्यामुळे एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रवर्तक किंवा विकासकाला त्या प्रकल्पासंदर्भात सर्व तपशील जाहीर करण्याची सक्ती होणार आहे. तसेच अशा प्रवर्तकांना व विकासकांना गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. हे प्राधिकरण अशा विकासकांवर सर्व प्रकारचे नियंत्रण ठेवणार आहे. या कायद्याचा आणि प्राधिकरणाचा उद्देश गृहबांधणी क्षेत्रात होणाऱ्या व्यवहारामध्ये पारदर्शकताआणणे हा आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विधेयक २०१२ या प्रस्तावित कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नियंत्रित विकास व घरबांधणी, सदनिकांच्या विक्री आणि हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्याबरोबरच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हितांचे संरक्षण होणार आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित रियल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) बिल, २०१३च्या कलम ७८मध्ये राज्य सरकारांनी या संदर्भातील कायदा स्वत: करावा,असे म्हटले आहे. या प्रस्तावित कायद्यामुळे चटईक्षेत्र निर्देशांक पाळण्यामध्ये गैरप्रकार करण्याचे आणि विकास नियंत्रण नियमावली धुडकावण्याच्या प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2013 रोजी प्रकाशित
गृहनिर्माण विधेयकाला राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र
कॅम्पा कोला कंम्पाऊंड इमारत प्रकरणाने गृहबांधणी उद्योग क्षेत्रात प्रभावी नियामक यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित केली आहे...
First published on: 18-11-2013 at 05:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan has writen letter to urban development minister girija vyas