उत्पन्नातून राज्य सरकारच्या उपक्रमांना मदत करा; मंत्रिमंडळ उपसमितीची अट
राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मुंबईत १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘कोल्ड प्ले’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश वाद्यवृंदाच्या कार्यक्रमासाठी सशर्त करमणूक करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने काही अटी घातल्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मात्र बीकेसी मैदान ७५ टक्के भाडे सवलतीने विनाअट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या सवलतीसाठीही आता एमएमआरडीए फेरविचार करून करमणूक शुल्कासाठीच्या अटी लागू करणार का, याबाबत मात्र अजून प्रश्नचिन्ह आहे.
करमणूक कराची रक्कम सुमारे सात कोटी रुपये इतकी असून किमान इतकी किंवा त्याहून अधिक रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीला द्यावी, सरकारने सुचविलेल्या कामांसाठी निधी द्यावा किंवा ती कामे करून द्यावीत, या कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे शासकीय लेखा परीक्षण व्हावे, अशा अटी मंत्रिमंडळ उपसमितीने आयोजकांना घातल्या आहेत. राज्य सरकारने एक हजार खेडय़ांच्या परिवर्तनाची योजना सामाजिक संस्थांच्या मदतीतून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत काही गावांची जबाबदारी ग्लोबल सिटिझनकडे सोपविण्याच्या प्रस्तावावरही विचार सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गरिबी हटावसह अनेक सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल सिटिझन’तर्फे १९ नोव्हेंबर रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात ‘कोल्ड प्ले’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी एक महिना चार दिवस हे मैदान ७५ टक्के भाडे सवलतीने देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत त्यांच्या सूचनेने घेण्यात आला होता. मैदानाचे भाडे आठ ते बारा कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर पाच हजार ते पाच लाख रुपयांच्या २० टक्के तिकीट विक्रीतून आयोजकांना सुमारे २८ कोटी रुपये मिळणार असून त्यावर ४५ टक्के इतका करमणूक कर आहे. मात्र ही रक्कम सात कोटी रुपये असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या भरघोस सवलती दिल्या जात असल्याने मुंबई ग्राहक पंचायत आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
..त्यामुळेच विरोध
शिवसेना-भाजप युती सरकारच्या १९९५ च्या कार्यकाळात पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमासाठीही मनोरंजन करातून सवलत दिल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढून सरकारचा निर्णय रद्दबातल केला होता. त्यामुळे महसूल, अर्थ विभागाने व एमएमआरडीएनेही सवलतींना विरोध करूनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर त्या देण्यात आल्या. खासदार पूनम महाजन या आयोजनात ‘सक्रिय’ असल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर सवलतींसाठी दबाव टाकण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मात्र करमणूक करात सवलतीचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागाने घाईघाईने आणल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे सोपविला. या समितीमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदी व मिशेल ओबामा येणार
कोल्ड प्ले कार्यक्रम मुंबईत आणण्यासाठी पूनम महाजन यांनी पुढाकार घेतला व त्या वेळी संकलित होणारी रक्कम राज्यातील सामाजिक कामासाठी वापरली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा, ज्येष्ठ उद्योगपती बिल गेट्स, कैलास सत्यार्थी आदी विदेशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अन्य क्षेत्रांतील नामवंत या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.