मुंबई : मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटकामुळे लहान बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध प्रशासनाने राबवविलेल्या मोहिमेनंतर आणखी दोन खोकल्याच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सुद्धा सतर्क झाली आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात राज्यातील या उत्पादनाच्या वितरणाचा आढावा घेतला. मात्र राज्यामध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधाचे वितरण झाले नसल्याचे आढळले.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी अवघ्या दोन दिवसांमध्ये मध्य प्रदेशने आणखी दोन खोकल्याच्या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडला असल्याचे जाहीर केले. रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या औषधांचा समावेश आहे. ही दोन्ही औषधे गुजरातमधील दोन उत्पादक कंपन्यांची आहेत. या दोन्ही औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ती औषधे भेसळयुक्त व दर्जाहीन असल्याचे मध्य प्रदेशकडून जाहीर करत यासंदर्भातील माहिती महाराष्ट्राला दिली आहे.
नव्याने दोन औषधांमध्ये सापडलेल्या औषधांबाबत महाराष्ट्रातील किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक, रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी या औषधांची विक्री, वितरण किंवा वापर करू नये असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्यातील संबंधित परवानाधारकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कार्यालयाला कोणत्याही साठ्याची किंवा पुरवठ्याची माहिती त्वरित कळविण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक दा. रा. गहाणे यांनी दिली.
डायथिलीन ग्लायकोलचे होणारे शरीरावर परिणाम
यथिलीन ग्लायकोल (डीईजी) हे एक विषारी रसायन आहे. डायथिलीन ग्लायकोल हे रसायन खोकल्याच्या औषधामध्ये असल्याचे त्याचे गंभीर परिणाम आरोग्यवर होता. याच्या सेवनाने विषबाधा होणे, मूत्रपिंड निकामी होणे, न्यूरोलॉजिकल गुंतागुंत आणि मृत्यू देखील होऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये या समस्या अधिक वेगाने घडतात.
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधाच्या सेवनाने लहान बाळांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री न करण्याचे निर्देश औषध विक्रेत्यांना दिले आहेत. मात्र औषध विक्रेत्यांकडून या निर्देशांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाणे व कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडून डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री होत असल्याचे आढळून येत आहे.