राज्यात भाजपच्या महायुतीला एकतर्फी यश मिळणार नाही… महाविकास आघाडीचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून येतील… राज्यात प्रचारासाठी फिरताना शेतकरी व तरुण वर्गाची भाजपबद्दलची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती, याचा अंदाज आल्यानेच पंतप्रधान मोदी यांच्याकडून विखारी प्रचार सुरू झाला आहे… लोकसभा निकालानंतर देशातील राजकीय चित्र नक्कीच बदलेल… अशी मते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांच्याशी झालेला संवाद:

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ मध्ये केला व आम्ही अडीच वर्षे सरकार चालविले. पण हा प्रयोग २०१४ मध्येही करण्याचा माझा प्रयत्न व नियोजन होते. पण ते यशस्वी झाले नाही. त्या वेळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर भाजपने न मागता मी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे शिवसेनेला भाजपबरोबर जाण्यापासून रोखायचे होते. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच वेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा २०१४ मध्ये माझा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर जाण्याचा तेव्हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना भाजप अधिक जवळचा वाटला. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग तेव्हा फसला. शिवसेनेकडून अडवणूक सुरू झाल्याने भाजपने आमच्याशी संपर्क साधला. शिवसेना – भाजपमध्ये वितुष्ट निर्माण व्हावे म्हणूनच मी शिवसेनेला सरकारमध्ये बरोबर ठेवण्यास विरोध केला होता. ‘माझा भाजप सरकारमध्ये शिवसेनेला सामील करण्यास २०१७ मध्ये विरोध होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पक्षांचे सरकार हवे होते,’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा सत्य नाही. मी २०१४, २०१७ व २०१९ मध्ये भाजपबरोबर सत्तेत जाण्यासाठी अजित पवार यांना पुढे करून आणि स्वत:ही चर्चा करून नंतर माघार घेतली व अजित पवार यांना तोंडघशी पाडले, हे दावेही खोटे आहेत. उलट माझा मोदी व भाजपबरोबर सत्ता सहभागासाठी विरोध होता.

Loksatta editorial Supreme court Seeks election commission over voter turnout percentage
अग्रलेख: उच्चपदस्थांची कानउघडणी!
maharashtra recorded most hate speeches according to csss report
पुरोगामी राज्यात द्वेषजनक भाषणे…
Tributes pour in for banker N Vaghul.
अग्रलेख : बँकर्सकार
maharashtra politics marathi news
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…
BJP Uddhav Thackeray Against this authoritarian tendency Article
बलाढ्य पराभवाच्या दिशेने…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nota
‘नोटा’ हा उमेदवार मानायचा का?
Loksatta editorial Election Commission is impartial About the disturbance at the polling stations
अग्रलेख: कल्पनाशून्य कारभारी!

हेही वाचा >>> पुरोगामी राज्यात द्वेषजनक भाषणे…

अजित पवारांना काय कमी दिले?

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेता आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही. मात्र अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, या अजित पवार यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. विरोधी पक्षनेत्याचे पद आणि विरोधी पक्षही लोकशाहीत कायम महत्त्वाचा असतो. माझ्या ५६ वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत मी केवळ २० वर्षे सत्तेत होतो. उर्वरित काळ मी विरोधी पक्षात घालवला. एस. एम. जोशी, कृष्णराव धुळप, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षात असूनही आपले स्थान निर्माण केले होते. बॅरिस्टर नाथ पै बोलायला उभे राहिल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूही थांबून त्यांचे भाषण ऐकत होते.

राष्ट्रवादीचे काही नेते सत्तेविना राहू शकत नव्हते. पाच वर्षे विरोधात काढली होती. आणखी विरोधात बसण्याची त्यांची इच्छा दिसत नव्हती. काही जणांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती. आमच्या काही भगिनींनी पाहिजे तर आम्हाला गोळ्या घाला, अशी वक्तव्ये केली होती. या मंडळींना भाजपबरोबर जाण्याची घाई झाली होती. पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही, हे या नेत्यांना सुरुवातीपासून मी बजावले होते.

हेही वाचा >>> अपघात? नाही, घातपातच

शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा होता. शिवसेना हा पक्ष नेतृत्वसापेक्ष आहे. यामुळेच मी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता किंवा कोणतीही हरकतही नव्हती. पण महाविकास आघाडीची बैठक झाली आणि नेतानिवडीचा विषय आला, त्या वेळी सर्वजण गप्प होते. शिंदे यांचे नाव आमच्यापुढे चर्चेत आले नव्हते. शिंदे यांच्या नावाबाबत शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचे आम्हाला नंतर समजले. पण त्या वेळी आम्हाला काहीही माहीत नव्हते. त्यामुळे मी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले. त्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा शिंदेंसह अन्य कोणाचेही नाव सुचविले नाही. शिंदे यांच्यावरून पक्षांतर्गत वेगळी चर्चा होती हे आम्हाला काहीच माहीत नव्हते. शिंदेंबरोबर आमचा त्या वेळेपर्यंत फारसा संबंध आलेला नव्हता. आता शिंदे आमच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत.

राज्यातील ५० टक्के जागा जिंकू

देशात यंदा चित्र मला वेगळे दिसते. भाजपच्या विरोधात वातावरण अनुभवाला येते. महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण आहे. राज्यातील ५० टक्के जागा आम्ही नक्कीच जिंकू. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांमधील भाजपच्या जागा गत वेळच्या तुलनेत घटणार आहेत. काही राज्यांमध्ये काँग्रेसच्या जागा वाढतील असे चित्र आहे. ओडिशामध्ये मोदी यांनी प्रथमच नवीन पटनायक यांच्यावर बोचरी टीका केली. त्यावरून पटनायक भाजपला मदत करतीलच असे नाही. ममता बॅनर्जी, स्टॅलिन आदी नेते भविष्यात भाजपबरोबर जाण्याची मला शक्यता दिसत नाही. २०१९च्या तुलनेत या निवडणुकीत भाजपचा देश पातळीवर आकडा कमी होईल.

मोदी वाजपेयींसारखे नाहीत

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना विरोधी पक्षातील नेत्यांनाही सन्मानाची वागणूक होती. अनेक संसदीय व शासकीय समित्यांवर पंतप्रधान, मंत्री किंवा अर्थमंत्र्यांबरोबर विरोधी पक्षनेत्याचाही समावेश होता. एका नियुक्तीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी एक नाव सुचविले होते व मी दुसऱ्याचे. पण वाजपेयी यांनी अडवाणींशी चर्चा करून माझा प्रस्ताव स्वीकारला होता. माझा त्या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता वाजपेयींनी माझी निवड स्वीकारली होती. विरोधकांना त्या काळात महत्त्व दिले जात असे.

सामाजिक सलोख्याची चिंता

मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर काही विभागांमध्ये मतदान झाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना मी आतापर्यंत एकदाच भेटलो असून त्यांच्या आंदोलनाशी माझा कोणताही संबंध नाही. तरीही आंदोलनामागे माझी फूस असल्याचे आरोप झाले. पण त्यात काहीही तथ्य नाही. माझ्या दृष्टीने सामाजिक सलोखा ही महत्त्वाची बाब आहे. दोन समाज आज एकमेकांसमोर उभे असून निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा टिकून राहील, हे पाहिले पाहिजे. दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून निर्माण झालेली तेढ दूर करावी लागेल.

अण्णा हजारे आहेत कुठे ?

माझ्याविरोधात तत्कालीन महापालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी प्रचंड आरोप केले होते. ट्रकभर पुरावे असल्याचे सांगितले होते. पण मी शांत व खंबीर राहिलो. पुढील काळात चौकश्या झाल्या आणि आरोप करणाऱ्यांच्या पुराव्यांमध्ये तथ्य नसल्याचे दिसून आले. पण या काळात शांत राहणे खूप अवघड असते. वैयक्तिक पातळीवर तथ्यहीन आरोपांकडे जनता कालांतराने फारशा गांभीर्याने पाहात नाही. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे व इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?

पंतप्रधानपदाचा त्याच दिवशी राजीनामा द्यावा लागला असता

एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिल्यावर मी पंतप्रधानपदाची संधी घालविली, असे विधान प्रफुल पटेल यांनी केले असले तरी हे विधान अर्धसत्य आहे. मी पंतप्रधानपद स्वीकारावे, अशी प्रफुल पटेल यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांची इच्छा होती. काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांचा मला पाठिंबा होता. कारण तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा गटनेता होतो. पण वेगळे काही घडत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. काँग्रेसमधील काही नेतेमंडळी माझ्या विरोधात होती. मी पंतप्रधानपदावर दावा करून हे पद मिळविले असते तर शपथविधी झाला त्याच दिवशी सायंकाळी राजीनामा देण्याची वेळ माझ्यावर आली असती. कारण मी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर लगेचच पाठिंबा काढून घेण्याचे कटकारस्थान काही मंडळींनी केले असते. शेवटी पंतप्रधानपदाचा वेगळा सन्मान असतो. काहीही करून मला ते पद मिळवायचे आहे, असे माझे नव्हते. मला त्या पदाची गरिमा घालवायची नव्हती. म्हणूनच मी आग्रह झाला तरी पंतप्रधानपद स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेतला होता. पंतप्रधानपद मिळाले नाही याची अजिबात खंत नाही. राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाला हे पद मिळेल असे नसते. मला तरुण वयात आमदारकी, मंत्रीपद मिळाले. मी माझ्या राजकीय कारकीर्दीबाबत समाधानी आहे.

राज ठाकरे बदलले

मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. पण काल मोदींच्या सभेत राज ठाकरे मला बदललेले बघायला मिळाले. त्यांनी पाच मागण्या मांडल्या. त्यांच्यात सकारात्मक बदल निश्चित झाला आहे. राज ठाकरे यांच्यातील आक्रमकपणा कमी झालेला आणि भाषा बदललेली जाणवली. हा बदल स्वागतार्ह आहे.

चिन्हाचा संभ्रम

राष्ट्रवादीचे चिन्ह बदलल्याचा आम्हाला काही प्रमाणात जरूर फटका बसला. निवडणूक आयोगाने आमचे घड्याळ हे चिन्ह काढून घेतले. आम्हाला तुतारी चिन्ह दिले. नवीन चिन्ह मिळाल्यावर आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ३० टक्के लोकांमध्ये चिन्हाचा संभ्रम निर्माण झाल्याचे आढळले. आमच्यासाठी ही बाब चिंताजनक होती. आम्ही नवीन चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पण मतदान यंत्रावर आमचे चिन्ह नीट दिसत नाही, अशा तक्रारी आल्या आहेत.

दरवाजे बंद

लोकसभा निकालानंतर अजित पवारांबरोबर गेलेल्या काही जणांनी पक्षात परत येण्याची विनंती केली तरी मी जुने सोडून गेल्यावर नव्याने नेतृत्व करणाऱ्या स्थानिक पातळीवरील माझ्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सोडून गेेलेल्यांना आमचे दरवाजे बंद झाले आहेत.

महाराष्ट्रात उद्याोगस्नेही वातावरण नाही

महाराष्ट्रात आज उद्याोगस्नेही वातावरण राहिलेले नाही, त्यामुळे उद्याोजक गुंतवणूक करताना विचार करीत आहेत. मी, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेक अधिकाऱ्यांनी चांगले काम केले. देशात कोणीही, कुठेही चांगला प्रयोग करीत असेल, तर आपले अधिकारी त्याला भेटण्यासाठी जात होते आणि राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण देत होते. पण आता उद्याोग खाते काय करते, हा मला प्रश्न पडला आहे. शेतीसाठीही बियाणे, उत्पादकता वाढविणे आणि किमान आधारभूत किंमत ही बाब महत्त्वाची असते. त्यांच्यासाठी निर्यात किंवा बाजारपेठ उपलब्ध असणे आवश्यक असते. मी कृषीमंत्री झालो, तेव्हा गहू आयात करण्यासंबंधीची फाइल माझ्याकडे आली होती. त्यास मंजुरी देणे मला अवघड वाटत होते. पण त्यानंतर कृषी क्षेत्र सुधारणा हाती घेतल्या. त्यामुळे मी जेव्हा पद सोडले, तेव्हा भारत गहू उत्पादनात जगात दुसरा, तांदळामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. आपल्या देशात उत्पादकता वाढविणे अवघड नाही, पण कृषीमालाला चांगली बाजारपेठ शोधणे महत्त्वाचे असते.

निवडणुकीत पैशांचा प्रचंड गैरवापर

सातारा, बारामती, माढा, शिरुर, अहमदनगर या मतदारसंघात पैशांचा मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर झाला असून तो आतापर्यंत कधीही झाला नव्हता. बारामतीमध्ये तर मध्यरात्रीपर्यंत बँक सुरू ठेवण्यात आली होती. त्यात अनेक लोक व पैसे आढळून आले. बँक व्यवस्थापकांवर निलंबन व अटकेची कारवाई झाली आहे. जनतेची मते पैशांनी विकत घेता येतातच, असे नाही. पण तसे झाले, तर येथील निवडणूक निकालांचे काही खरे नाही. अनेक ठिकाणी गैरप्रकारांच्या तक्रारी येत असल्या तरी निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली जात नाही.

मतदानापूर्वीच बोटाला शाई

यंदाच्या निवडणुकीतील काही प्रकार हे राज्यासाठी भविष्यातील निवडणुकीत घातक ठरू शकतात. काही विशिष्ट समाजाचे मतदान विरोधात होत असल्याचे निदर्शनास आल्याने काही ठिकाणी मतदानाच्या पूर्वीच मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे प्रकार घडले आहेत. अशा ३० ते ४० तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. निवडणूक आयोगाची शाई आधीच बाहेर आली कशी ? हे सारे गंभीर आहे.

वंचितचा प्रभाव पडला नाही

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा चांगला प्रभाव पडला होता. यंदा तसा प्रभाव दिसत नाही. गेल्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिमांची मोट वंचितने बांधली होती. यंदा मुस्लीम समाजाने विचारपूर्वक मतदान केले आहे. हे मतदान वंचितला झालेले नाही. तसेच संविधान बदलण्याच्या चर्चेने दलित समाजातही भाजपच्या विरोधात अस्वस्थता होती. याचाही फटका वंचितला बसला आहे.

शब्दांकन संतोष प्रधान, उमाकांत देशपांडे