मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी योग्य उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याचे बोलले जात असले तरी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी पक्षाच्या कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्याचा दावा कॉंग्रेस पक्षाने केला आहे. दोन दिवसात साडे चारशेपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून प्रशासकीय पातळीवरून प्रक्रिया पार पाडली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षही जोरदार तयारीला लागले आहेत. काही पक्षांमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जात आहे. उमेदवार निवडीसाठी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेणे, उमेदवारांची ताकद, जनसंपर्क या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. यास इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात ४५० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे. अर्ज घेण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असून दोन दिवसात साडेचारशे पेक्षा जास्त अर्ज इच्छुकांनी घेतले असल्याने ही संख्या मोठ्या प्रमाणात आणखी वाढू शकते असेही राजहंस म्हणाले.

११२ वरून ३१ नगरसेवक ….

दरम्यान, गेल्या काही वर्षात मुंबईत कॉंंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली असून नगरसेवकांची संख्याही कमी कमी होऊ लागली आहे. १९९२ मध्ये तब्बल ११२ नगरसेवक असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे २०१७ च्या कार्यकाळात केवळ ३१ नगरसेवक होते. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या केवळ वर्षा गायकवाड या एकमेव खासदार जिंकून आल्या. तर विधानसभेलाही केवळ तीन आमदार निवडून आले. त्यामुळे पालिका निवडणूकीत यश मिळवणे कॉंग्रेससाठी अवघड असल्याची चर्चा आहे. मात्र तरीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

अर्जासोबत पाच हजार रुपये

कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्जाचे पाचशे रुपये शुल्क आणि पाच हजार रुपये घेतले आहेत. त्यातही अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवांकडून दोन हजार रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली आहे. विशेष म्हणजे २०२२ मध्येही निवडणूक होण्याची शक्यता गृहित धरून उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले होते व तेव्हाही इच्छुक उमेदवारांकडून पाच हजार रुपये घेतले होते.