मुंबई – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. संस्कृती अमीन असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरूणीचे नाव आहे.
संस्कृती ही जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आई वडिलांसह रहात होती. तिच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला असून नुकतीच ती एका खासगी बॅंकेत रुजू झाली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जाण्यासाठी निघाली होती.
मजासवाडीच्या धोबीघाट परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संस्कृती याच इमारतीच्या खालून जात होती. त्यावेळी साडेनऊच्या सुमारास इमारतीवरून सिमेंटची वीट (ब्लॉक) संस्कृतीच्या डोक्यावर पडली. ती बेशुध्द होऊन खाली पडली. तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकऱणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अपमृ्त्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र ते केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी दिली.
बांधकाम स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न कायम
या घटनेमुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा ठिकणी बांबूचे बांधकाम मजबूत व प्रमाणित असणे बंधनकारक आहे. इमारतीच्या बाहेरील भागात संरक्षक जाळ्या (नेटिंग) लावणे आवश्यक आहे. म्हणजे काही वस्तू पडल्यास ती जमिनीवर न पडता जाळीत अडकते. इमारतीच्या आजूबाजूला प्रोटेक्टिव्ह कॅनोपी आवश्यक असते. इमारतीवरून जर चुकून एखादी वीट, दगड, सिमेंटचा तुकडा, स्क्रू, लोखंडाचा भाग किंवा बांधकामातील अवशेष खाली पडला, तर तो थेट जमिनीवर न पडता त्या कॅनोपीवर आदळतो आणि त्यामुळे खाली जाणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचतो.
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीभोवती प्रवेश निषिध्द करणे गरजेचे असते. सार्वजनिक रस्ता किंवा पदपथावर काम चालू असल्यास टिनचे किंवा प्लास्टिक शेड्स बसवणे, पादचारींच्या सुरक्षिततेसाठी सूचना फलक लावणे, रात्री काम सुरू असेल तर रिफ्लेक्टर आणि लाइट्स लावणे बंधनकाकरक आहे. बांधकाम अभियंता आणि पर्यवेक्षकाने वारंवार या सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी करणे आवश्यक असते.