मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे रुग्णालयामधील सफाईचा बोजवारा उडाला होता. शस्त्रक्रिया विभागामध्ये सफाई करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने मंगळवारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, मात्र बुधवारी काही शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना केईएम, नायर व शीव रुग्णालयामध्ये पाठविण्याची तयारी रुग्णालय प्रशासनाने केली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दुपारी ३ वाजता संप मागे घेतल्याने अन्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पाठविण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र सकाळच्या सत्रातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.
कूपर रुग्णालयामध्ये बहुउद्देशीय कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी मे. के. एच. एफ. एम हॉस्पिटॅलिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंत्राटदारावर आहे. कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन न दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले हाेते. त्यामुळे रुग्णालयातील सफाईचा बोजवारा उडाला हाेता. काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णालयाच्या आवारामध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढला होता. यावेळी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस व तात्पुरता दंड आकारून त्याची सेवा डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवघ्या २० दिवसांतच कंत्राटदाराकडील कर्मचाऱ्यांनी चार महिन्याचे वेतन न दिल्याने आंदोलन पुकारले.
यामुळे रुग्णालयामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. तसेच शस्त्रक्रियागृहामध्ये प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर उपकरणे व शस्त्रक्रियागृहा स्वच्छ करणे आवश्यक असते. मात्र कंत्राटी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रियागृहाची साफसफाई रखडली. परिणामी मंगळवारी रुग्णालयातील अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. मात्र दुसऱ्या दिवशीही संप कायम राहिल्याने बुधवारी सकाळच्या सत्रातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. मात्र काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रुग्णालय प्रशासनाने सुरू केली होती. त्यानुसार केईएम, शीव, नायर रुग्णालयातील प्रमुखांशी चर्चा करण्यात आली. मात्र दुपारी ३ वाजता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आणि ते कामावर रूजू झाल्याने अन्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्ण पाठविण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दुपारी संप मागे घेतल्याने रुग्णालयातील सेवा सुरळीत सुरू झाली. संबंधित कंत्राटादाराला यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो उपायुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. – डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय