संदीप आचार्य 
मुंबई: करोनाचे वाढते रुग्ण आणि रुग्णालयातील उपलब्ध खाटा यांचे व्यस्त होत चाललेले प्रमाण लक्षात घेऊन दाखल असलेल्या रुग्णांमधील लक्षण नसलेले व बरे होण्याच्या मार्गावरील रुग्णांची आता अन्यत्र व्यवस्था करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी नायर रुग्णालयाच्या आवारात, एमएमआरडीए, गोरेगाव, वरळी आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचे रुग्ण वाढत असल्याची चिंता एकीकडे पालिका प्रशासनाला लागली असतानाच दुसरीकडे करोनाची लागण झालेले अनेक रुग्णांचे लक्षणरहित होण्याचे प्रमाण १४ दिवसांवरून आठ ते दहा दिवसांपर्यंत आल्याचे पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईत जरी करोनाचे प्रमाण वाढत असले तरी त्यातील ८० टक्के लोक हे कोणतेही लक्षण नसलेले आढळून येत आहेत. विशेष म्हणजे अनेक रुग्णांची आठव्या ते दहाव्या दिवशी केलेली चाचणी निगेटिव्ह आल्याचेही पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लागण होऊन उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी ज्यांची प्रकृती बरी आहे तसेच कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

महाराष्ट्रात सोमवारपर्यंत ८ हजार पेक्षा जास्त करोनाची लागण असलेले रुग्ण आढळून आले होते. यातील ६२ टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती तर एकूण १०७६ रुग्ण बरे झाले असून यात निम्म्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. या सर्वाचा विचार करून मुंबईसाठी नियुक्त केलेल्या डॉ संजय ओक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयात उपचारानंतर कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना पुढील काही दिवस निरीक्षणाखाली अन्यत्र व्यवस्था करण्याची शिफारस केली.यामुळे सध्या पालिका रुग्णालयांवर येणारा ताण कमी होऊन नवीन रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध होतील. याबाबत डॉ संजय ओक यांना विचारले असता ते म्हणाले की, “करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जवळपास सात हजार खाटा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात पालिका रुग्णालयात साडेतीन हजार खाटांची ऑक्सिजनसह व्यवस्था असेल तर खासगी रुग्णालयात साडेतीन हजार खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.”

“नायर रुग्णालयात ८०० खाटा येत्या आठवडाभरात तयार होतील. त्याचबरोबर येथे उपचारानंतर लक्षणे दिसत नसलेल्या म्हणजे बरे होण्याच्या मार्गावरील रुग्णांसाठी नायरच्याच आवारात २७५ खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांवर पुढील काही दिवस डॉक्टरांकडून बारीक लक्ष ठेवले जाईल व पूर्ण बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात येईल. अशाच प्रकारे वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर ३००० जणांची, गोरेगाव एनएससी ग्राऊंड येथे १००० जणांची, लक्ष्मी इंडस्ट्रीज येथे ३०० जणांची तर वरळी येथे लक्षणे नसलेल्या ५०० रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे” असेही डॉ संजय ओक यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients increasing in mumbai and beds are falling short now scj
First published on: 28-04-2020 at 12:34 IST