एका रुग्णाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गुरुवारी करोनाच्या २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर १०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यात सात लाख ४३,९६६ रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे.

मुंबईत गुरुवारी ४४,४८४ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी २१८ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा संख्या सात लाख ६४ हजार ६६२ वर गेली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या आतापर्यंत सात लाख ४३ हजार ९६६ वर पोहोचली आहे. मुंबईतील एक रुग्ण गुरुवारी दगावला असून आता मृत्यूची एकूण संख्या १६ हजार ३५४ वर पोहोचली आहे. आजघडीला मुंबईत एक हजार ७६५ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्णवाढीचा दर दोन टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर दोन हजार ६१३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत १० इमारती प्रतिबंधित आहेत.

७८९ नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात करोनाच्या ७८९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून सात जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्हा ११९, नगर जिल्हा ६३, पुणे जिल्हा १८२, सातारा जिल्हा ३३ रुग्ण आढळले. मृतांमध्ये मुंबई, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी एक तर पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. जोखमीच्या देशातून आलेल्या ८० जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५५ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात १११ नवे बाधित

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १११ करोना रुग्ण आढळून आले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १११ करोना रुग्णांपैकी ठाणे ४५, नवी मुंबई ३५, कल्याण-डोंबिवली १०, मीरा-भाईंदर नऊ, ठाणे ग्रामीण आठ, उल्हासनगर दोन, अंबरनाथ एक आणि भिवंडीत एक रुग्ण आढळून आला, तर दोन मृतांपैकी मीरा-भाईंदरमधील एक आणि ठाणे ग्रामीण भागातील एकाचा सामावेश आहे.