दिवसभरात सहा लाखांहून अधिक नागरिकांना लाभ

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकाची नोंद केली. दिवसभरात राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली. यामुळे लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र आहे.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी ९१ लाखांहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण करून उच्चांक नोंदविण्यात आला होता. बुधवारी दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून, त्यात आणखी वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

देशात दिवसभरात ६२ लाख मात्रा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात बुधवारी ६२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. नवे लसधोरण लागू केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी विक्रमी ८८ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला. मंगळवारी ५२.८ लाख जणांना लस देण्यात आली. तिसऱ्या दिवशी मात्र लसीकरण मोहिमेचा वेग आणखी वाढून ६२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. मात्र, पहिल्या दिवसाचा लसविक्रम कायम राहिला.