मुंबई : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लादल्याने देशातील अनेक लघुउद्योग मोठ्या संकटात सापडले आहेत. या आयात शुल्कामुळे किमती प्रचंड वाढल्याने अमेरिकन ग्राहकांनी भारतीय वस्तूंकडे पाठ फिरवली आहे. परिणामी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सुरू असलेले छोटे व्यवसाय, विशेषत: कुरियरवर आधारित दागिने, पारंपरिक साड्या आणि भारतीय खाद्यपदार्थांचा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
भारतातील अनेक लघुउद्योजक अमेरिकेतील बाजारपेठेत आपली उत्पादने पाठवत असतात. त्यात दागिने, कपडे, खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे. या लघुउद्योगांची वार्षिक उलाढाल अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. हजारो महिला उद्योजिका आणि लहान व्यावसायिक या व्यवसायांवर अवलंबून आहेत. अमेरिकेने ६ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लादले. त्याचे मोठे पडसाद देशांतर्गत विविध व्यवसायांवर पडू लागले आहे.
दागिने, खाद्यपदार्थ, साड्यांचा व्यवसाय अडचणीत
अनेक भारतीय लघुउद्योजक, निर्यातदार विविध भारतीय वस्तू अमेरिकेत पाठवत असतात. त्यात दागिने, खाद्यपदार्थ, साड्या आदींचा समावेश आहेत. कुरियरद्वारे हा व्यवसाय ते करत असतात. त्यांना या आयात शुल्काचा मोठा फटका बसला आहे. आमचे सर्व ग्राहक अमेरिकेत आहेत. आम्ही कुरिअरद्वारे वस्तू पाठवतो. पण या नव्या आयात शुल्कामुळे आमच्या दागिन्यांच्या किंमती तिथे जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत. परिणामी, विक्री कमी झाली आहे, असे मुंबईतील फराळ तयार करणाऱ्या उद्योजिका श्वेता कांबळे यांनी सांगितले. अशीच अवस्था पैठणी आणि बनारसी साड्या निर्यात करणाऱ्य़ा विक्रेत्या निर्यातदारांची झाली आहे.
वाढीव किमतीमुळे अमेरिकन ग्राहक आता कमी किमतीच्या इतर देशांतील स्वस्त पर्यायांकडे वळले आहेत. केवळ कपडे किंवा दागिनेच नव्हे, तर कुरिअरद्वारे अमेरिकेत पाठवला जाणारा चिवडा, लाडू आदी फराळाची मागणी ४०-५० टक्क्यांनी घटली आहे. वाढलेल्या दरांमुळे अमेरिकन ग्राहक आता हे पदार्थ खरेदी करण्यास तयार नाहीत. परिणामी, भारतीय लघुउद्योजकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे, असे उद्योजकांनी सांगितले.
अनेक भारतीय लघुउद्योजक अमेरिकन बाजारपेठांवर अवलंबून आहेत. आयात शुल्क वाढल्याने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती अमेरिकेत प्रचंड वाढल्या आहेत. अनेक ऑर्डर रद्द करण्यात येऊ लागल्या आहेत. अनेक छोटे व्यवसाय बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, अशी प्रतिक्रिया एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
निर्यातीवर परिणामाची भिती
सध्या हे शुल्क कपडे, दागिने, फर्निचर, खाद्यपदार्थ आणि औद्योगिक वस्तूंवर लागू आहे. भारताच्या ८७ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होणार असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अमेरिकन आयात शुल्क (टॅरिफ) हा फक्त व्यापार वाद नाही, तर रोजगार आणि परकीय चलनावर थेट घाव आहे. त्यावर तोडगा निघाला नाही तर भारताच्या निर्यात क्षेत्राला दीर्घकालीन फटका बसेल, असे निर्यातदार अनिल देशमुख यांनी सांगितले.