मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? याविषयी त्यांचे म्हणणे १८ मेपर्यंत मागितले आहे.

सरकारी वकिलांच्या अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, तुमचा जामीन का रद्द करू नये ? अशी विचारणा करून न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या एकाही अटीचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचे न्यायालयाने बजावले होते. असे असतानाही राणा दाम्पत्याकडून अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केली आहे. प्रसारमाध्यमांसमोर आरोपांशी संबंधित वक्तव्ये करू नयेत, अशी अट न्यायालयाने राणा दाम्पत्याला घातली होती.

मात्र जामिनानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर विविध विधानं केली गेली आहेत. त्यामुळे या अटींचं उल्लंघन झालं असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने राणा दाम्पत्यास नोटीस बजावली आहे.

मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, रवी आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले असून, जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द व्हावा आणि या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे.

न्यायालयाने राणा दाम्पत्यास १८ मे पर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी देखील त्यावेळीच होणार असल्याचे सांगितले आहे.