मुंबई: सध्या रुग्णालयांमध्ये श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढत असून विशेषतः हृदय किंवा फुफ्फुसांचे विकार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सौम्य स्वरूपातील करोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र करोना आणि अन्य संसर्गजन्य आजारांची लक्षणे बहुतांशी सारखीच असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप अशा अनेक लक्षणांमुळे डॉक्टरांना करोना ओळखणे थोडे अवघड झाले आहे.

परिणामी, डॉक्टरांना नेमके निदान करणे कठीण होत आहे. मात्र काही विशिष्ट लक्षणे आणि तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे अंदाज बांधणे शक्य होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये दिसत असलेल्या लक्षणांच्या आधारे अंदाज बांधावेत. तसेच डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने उपचार सुरू करावेत, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

करोनाची लक्षणे

करोनाचे एक ठळक लक्षण म्हणजे सुगंध व चव जाणे. विशेषतः पहिल्या लाटेत हे खूप दिसत होते. सध्याच्या नवीन प्रकारांमध्ये हे लक्षण कमी प्रमाणात दिसते. इतर श्वसनविषयक आजारांमध्ये हे फारच दुर्मिळ आहे. करोनामध्ये लक्षणांची सुरुवात अनेकदा सौम्य व हळूहळू होते आणि ती फुफ्फुसांवर जास्त परिणाम करणारी असते.

करोना रुग्णांमध्ये फुफ्फुसांशिवाय अन्य लक्षणे दिसून येत आहेत. विशेषतः लसीकरणानंतर या लक्षणांचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये भूक न लागणे, मळमळ, उलटी, अतिसार, पोटात किरकिर, वेदना, डोकेदुखी (कधी अतिशय तीव्र, इतर लक्षणांपेक्षा जास्त), गरगरणे, एकाग्रता कमी होणे, मेंदूचा दाह (मेनिंजायटिस), झापडणे, पक्षाघात, मिरगी, चेहऱ्याचे स्नायूंची हलचाल बंद होणे, हातपाय सुन्न होणे असे मज्जातंतू संदर्भातील विकार, सतत थकवा, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, मानसिक अस्वस्थता अशी लक्षणे साधारणपणे करोना रुग्णांमध्ये दिसून येतात.

डेंग्यू किंवा चिकुनगुनिया

तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, शरीरावर पुरळ, तीव्र अंगदुखी (स्नायू आणि सांध्यांची वेदना) ही लक्षणे आढळतात. त्याचबरोबर डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे हे लक्षण रक्त तपासणीमध्ये समजते, पण करोनामध्ये क्वचितच दिसते.

हिवताप

हिवतापामध्ये सुरुवातीला ताप येतो. हा ताप तीव्र असू शकतो आणि वारंवार येऊ शकतो. तसेच तापासोबतच थंडी वाजणे हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे. डोकेदुखी, अंगदुखी विशेषतः स्नायू आणि सांधेदुखी होऊ शकते. उलट्या आणि मळमळ, अतिसार, अशक्तपणा अशी महत्त्वपूर्ण लक्षणे हिवतापामध्ये दिसून येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्फ्लूएंझा

इन्फ्लूएंझामध्ये उष्णतेसह उच्च ताप, नाक वाहणे (रिनोरिया), खोकला, सांधे व स्नायूंमध्ये वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे, विशेषतः विश्रांती घेताना, किंवा वाक्यात बोलता न येणे, तंद्री किंवा चेतना कमी होणे, छातीत सतत वेदना होणे, त्वचा थंड किंवा चिकट होणे किंवा फिकट गुलाबी होणे किंवा निळसर रंग येणे अशी लक्षणे साधारणपणे दिसून येतात.