मुंबई : मुंबईमध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्यावर्षी महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, देशातील महानगरांमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार अथवा बलात्कारानंतर हत्येच्या प्रकरणांतील सर्वाधिक गुन्हे मुंबईत घडले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०२१ च्या आकडेवारीतून ही बाब उघडकीस आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबई २०२१ मध्ये महिलांशी संबंधित ५५४३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. मुंबईत २०१९ मध्ये महिलांशी संबंधित ६५१९ गुन्हे घडले होते. त्यात बलात्कार, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. करोनाकाळात २०२० मध्ये टाळेबंदी असतानाही महिलांशी निगडीत ४५८३ गुन्हे घडले होते. 

देशातील महानगरांमध्ये २०२१ मध्ये सामूहिक बलात्कार अथवा बलात्कारानंतर हत्येचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे चार गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पाठोपाठ बंगळूरुमध्ये सामूहिक बलात्कार अथवा बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याच्या तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईत हुंडाबळीचेही १२ गुन्हे घडले आहेत. तर महिलांच्या अपहरणाच्या ११०३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय मुंबईत ३६४ बलात्काराची प्रकरणे घडली आहेत. तर विनयभंगाच्या उद्देशाने मारहाणीचे १६२५ गुन्हे, ४८१ विनयभंगांचे गुन्हे घडले आहेत.

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातील महिलांशी निगडीत एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांचे अपहरण आणि बलात्कार, महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, महिलांची विनयभंगाच्या करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करणे यांसारख्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या  क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी देशभरात महिलांच्या विरोधात घडलेल्या एकूण चार लाख २८ हजार २७८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक (५६ हजार ०८३) गुन्हे नोंदवले गेले. त्यानंतर राजस्थान (४० हजार ७३८) आणि महाराष्ट्राचा (३९ हजार ५२६) क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश महिलांच्या अपहरणाचे सर्वाधिक म्हणजे १० हजार ५७४ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ बिहार (८६६१) आणि महाराष्ट्राचा (७५५९) क्रमांक लागतो. अपहरणाबाबत महानगरांचा विचार केल्यास दिल्ली ३९४८ गुन्ह्यांसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई ११०३ आणि बेंगळूरु ५७८ गुन्हे दाखल आहेत. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल महाराष्ट्रात ९२७ गुन्हे नोंद असून मध्य प्रदेश ७५८ आणि पश्चिम बंगाल ४५६ गुन्हे दाखल आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against women reduced in 2021 compared to 2019 zws
First published on: 31-08-2022 at 01:14 IST