लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : चालत्या बसमध्ये २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. इरफान हुसेन शेख (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वांद्रे परिसरात वास्तव्याला आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास २४ वर्षीय तरुणी बस क्रमांक १६७ मधून प्रभादेवी – कुरणे चौक दरम्यान प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान मागे उभे असलेल्या अनोळखी व्यक्तीने जवळीक साधून तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने काही दिवसांनी वरळी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ मधील अधिकारीही याप्रकरणाचा समांतर तपास करीत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाने बस मार्गावरी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण मिळवून तपास सुरू केला. आरोपी वरळी दूरदर्शन या भागात बसमधून उतरल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात आढळले. २५ ठिकाणीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची पडताळणी केल्यानंतर आरोपीची माहिती पथकाला मिळाली. तो वरळीतील एका कंपनीत नोकरीला असल्याचे समजताच त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला वरळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वरळी पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.